ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी गुंतले टक्केवारीत! लाच घेताना वैद्यकीय अधिका-याला अटक

५ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेत असताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात डॉ. मुरुडकर यांना रंगेहात पडकण्यात आले.

राज्यात सगळीकडेच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. एकीकडे हे चित्र असताना, दुसरीकडे मात्र वाढत्या रुग्णांच्या आकड्यांचा गैरफायदा घेऊन काही भ्रष्ट अधिकारी आपल्या पासबूकवरचा आकडा वाढवत आहेत. ठाण्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे, तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी टक्केवारीत गुंतले आहेत. वैद्यकीय उपकरणे पुरवणाऱ्या कंपनीकडे १० टक्के म्हणजे १५ लाख रुपयांची लाच मागून, ५लाखांचा पहिला हप्ता घेताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजू केरबा मुरुडकर याला अटक करण्यात आली आहे.

१५ लाख रुपयांची मागणी

डॉ.राजू मुरुडकर हे ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा मंजूर करुन कत्रांट मिळवून देतो, असे सांगून वैद्यकीय उपकरणे पुरवणाऱ्या एका कंपनीकडे निविदेच्या रक्कमेच्या १० टक्के अशा एकूण १५ लाख रुपयांची मुरुडकर यांनी मागणी केली.

(हेही वाचाः ९ तासांच्या चौकशीनंतर प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयातून बाहेर! गूढ वाढले)

लाच घेताना रंगेहात अटक

संबंधित कंपनीला हे मान्य नसल्यामुळे कंपनीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेत असताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात डॉ. मुरुडकर यांना रंगेहात पडकण्यात आले. याप्रकरणी डॉ.मुरुडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here