‘या’ राज्यात ड्रोनद्वारे पोहोचणार लस… काय आहे उपक्रम?

हा प्रकल्प तेलंगणातील 16 ग्रीन झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर घेण्यात येणार आहे.

नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि तेलंगणाचे माहिती, तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामराव यांनी शनिवारी पहिला मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रोजेक्ट लॉन्च केला. ज्याचा उद्देश ड्रोनच्या माध्यमातून दुर्गम भागात लस आणि इतर आवश्यक उत्पादनं पोहोचवणे हा आहे. यामध्ये मारुत ड्रोन आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, हेलीकॉप्टर, ब्लू डार्ट मेड एक्स्प्रेस, ब्लू डार्ट आणि स्काय एअर यांचा समावेश आहे.

प्रायोगिक तत्वावर सुरू करणार

मेडिसिन फ्रॉम द स्काय हा प्रकल्प तेलंगणातील 16 ग्रीन झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर घेण्यात येणार आहे. यामध्ये तयार करण्यात येणा-या डेटाच्या आधारावर हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर वाढवण्यात येईल, असे सिंधिया यांनी सांगितले. मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रोजेक्ट हा तेलंगणातील जागतिक आर्थिक मंच, नीती आयोग आणि अपोलो हॉस्पिटलच्या हेल्थनेट ग्लोबल यांच्या भागीदारीतून साकारण्यात आलेला एक उपक्रम आहे.

आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उपयोग होणार

भारतात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या ग्रामीण व दुर्गम भागात खूप कमी आहे. देशातील अनेक भागांत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे ही डोंगराळ, जंगल किंवा नदी क्षेत्रात आहेत. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे वर्षातील अनेक महिने ही केंद्रे रस्त्यांपासून तुटली जातात. बर्फाळ प्रदेशात देखील हवामानाच्या समस्यांमुळे आरोग्य सुविधा पोहोचवणे कठीण होते. त्यामुळे या भागांत कोविड-19 लसीकरण करणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे अशा भागातील हवामानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हेलिकॉप्टर ड्रोन तयार करण्यात आल्याचे मारुत ड्रोनेटेकचे संस्थापक प्रेमकुमार विस्लावाथ यांनी सांगितले.

आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान यांची सांगड

माहिती व तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामराव म्हणाले की, हा प्रकल्प तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवेचा एक महत्वाचा बिंदू आहे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात राज्य आघाडीवर आहे. ड्रोन इकोसिस्टमसाठी भांडवल गोळा करण्याच्या पैलूंचा शोध घेण्याकरिता WEF ने तेलंगणा सरकार, PHFI आणि नीती आयोग यांचा समावेश असलेल्या इंडस्ट्री कोअर ग्रुपची नियुक्ती केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here