ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात वाढ झाल्याने, बर्फ वितळू लागला आहे. या तापमानात झालेल्या वाढीमुळे बर्फाचा जाड थरही वितळू लागला आहे. रशियातल्या सायबेरियातील हिमप्रदेशात आजपर्यंत कधीही वितळला नव्हता, असा बर्फही आता वितळू लागला आहे. त्यामुळे आता लाखो- हजारो वर्षांपासून बर्फाखाली गाडले गेलेले महाभयंकर विषाणू सजीवावस्थेत येत आहेत. सजीवावस्थेत येणारे हे घातक विषाणू जगभरात थैमान घालू शकतात, अशी भीती वर्तवण्यात आली आहे.
विषाणू सजीवावस्थेत येण्याची भीती
ही भीती रशियाचे वरिष्ठ राजदूत वनिकोलाय कोर्चुनोव यांनी वर्तवली आहे. हिमयुगापासून गाडले गेलेले महाभयंकर विषाणू जर सजीवावस्थेत आले, तर सजीव सृष्टीवर काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास रशिया करत आहे, अशी माहिती कोर्चुनोव यांनी दिली आहे. वेझदा नावाच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोर्चुनोव म्हणाले की, अति प्राचीन काळापासून असलेले विषाणू आणि जीवाणू आता सजीवावस्थेत येण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळेच यावर अभ्यास करण्यासाठी एक गट तयार करण्यात आला आहे. सध्या तो बर्फ झपाट्याने वितळत असल्याने भविष्यात कोणते संसर्गजन्य आजार पसरू शकतात, याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. बर्फ वितळायला लागल्याने हजारो, लाखो वर्षांपासून बर्फात दबलेले प्राणी आणि त्यांचे अवशेष सापडायला सुरुवात झाली आहे.
एका विषाणूचा शोध लागला
14 हजार वर्षांपूर्वीच्या लोकर असलेल्या गेंड्याचे अवशेष, तसेच 40 हजार वर्ष जुन्या कोल्ह्याचे शिर नुकतेच सापडले आहे. हे अवशेष मिळायला लागल्यानंतर या प्राण्यांच्या शरीरातील किंवा कातडीवरील विषाणूही बाहेर यायला सुरुवात होईल, अशी भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. आईक्स मार्से विद्यापीठातील विषाणूतज्ज्ञ जीन क्लावेरी यांनी गेल्या वर्षी अतिप्राचीन काळापासून बर्फात गोठलेल्या एका विषाणूचा शोध लावला होता. ज्याने बर्फ वितळताच एकपेशीय सूक्ष्मजंतूंवर (अमिबा) हल्ला चढवला होता. हे संशोधन करताना त्यांनी इशारा दिला होता की बर्फात गोठलेले विषाणू पुनरुज्जीवीत होऊ शकतात.
( हेही वाचा: कृपया ध्यान दे। ऑनलाईन तिकीट बुक करताय, जाणून घ्या नवे बदल )