केंद्रीय वने, पर्यावरण आणि वातावरणीय बदलांची टीम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात…

225
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून सार्वजनिक प्रवासासाठी सुरु होणा-या मुलुंड ते गोरेगाव बोगद्याच्या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय अधिका-यांनी उद्यानाला नुकतीच भेट दिली. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल या विभागाची तीन सदस्यीय समितीने उद्यानाला भेट देत बोगद्यामुळे होणा-या पर्यावरणीय बदलांवर अहवाल सादर करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत. आयआयटीसारख्या नामांकित संस्थांकडून अहवाल सादर करुन घेत बोगद्यामुळे पर्यावरणाचे नुकसान झाले तर त्याला जबाबदारही संबंधित संस्थांना धरले जावे, अशी स्पष्ट ताकीद सदस्यांनी दिली. या बोगद्याला पर्याय म्हणून इतर उपाययोजना विचारात घ्या, असेही सदस्यांनी वनाधिका-यांना सांगितले.
गेल्या चार-पाच वर्षांपासून या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईतील पश्चिम उपनगर ते ठाण्यापर्यंतचा प्रवास सुखकर होईल, असा दावा करण्यात येत आहे. बोगद्याला येण्या-जाण्याची सुरुवात उद्यानाच्या बाहेर असली तरीही रस्ता उद्यानातून जातो. उद्यानातील अतिसंरक्षित क्षेत्रातून या बोगद्याचा मार्ग जात असल्याचा प्रस्ताव राज्य तसेच राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाने मंजूर केला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या बोगद्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेवर होणा-या परिणामांचा अहवाल केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदलांची सदस्य टीम उद्यान प्रशासनाकडे विचारत होती. मागणीला काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेरिस सदस्यांनी यंदाच्या आठवड्यात थेट मुंबईत येऊन उद्यानच गाठले. दोन दिवसांच्या भेटीत सदस्यांनी बोगद्याची जागा तसेच भांडूप येथील परिसरालाही भेट दिली. सदस्यांच्या पहिल्याच भेटीच्या दिवशी वनविभागाच्या पश्चिम वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ क्लेमेंट बॅन, उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक जी मल्लिकार्जून यांच्याशी सदस्यांची चर्चा झाली. या भेटीचा सविस्तर अहवाल सदस्य टीम लवकरच तयार करणार आहे.

प्राण्यांच्या आरोग्याच्या दुर्लक्षिततेबाबत बेजबाबदार उत्तरे

राष्ट्रीय उद्यानात पूर्णवेळ व निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने प्राण्यांच्या देखभालीत कमालीचे दुर्लक्ष होत आहे. प्राण्यांचा एकामागोमाग एक मृत्यू होत असल्याचे स्पष्टीकरणही टीम सदस्यांनी उद्यान प्रशासनाकडे मागितले. यावर आम्ही प्राण्यांची काळजी घेत असून अधूनमधून मृत्यू होत असतात, असे बेजबाबदार विधान वनाधिका-यांनी दिल्याने सदस्य टीमलाही धक्का बसला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.