गीत रामायणः गदिमा आणि बाबूजींच्या अजरामर कलाकृतीचे भन्नाट ‘किस्से’!

गीत रामायण या कलाकृतीबद्दलचे किस्से हे सुद्धा एक वेगळा अनुभव देणारे आहेत. त्याच किस्स्यांची आठवण ताजी करुन हा सोहळा अनुभवण्यासाठीचा हा एक प्रयत्न...

स्वये श्रीराम प्रभू ऐकती,
कुश लव रामायण गाती…

रामायण हा शब्द उच्चारला की आजही आपण नकळत हे गाणं गुणगुणायला लागतो. गदिमा आणि बाबूजी या जोडीने तयार केलेली असामान्य कलाकृती म्हणजे ‘गीत रामायण’… रामायणातील प्रत्येक प्रसंग जिवंत करणा-या या असीम द्वयींच्या प्रगल्भ प्रतिभेबद्दल, बोलावं तितकं थोडं आहे. गदिमांचे शब्द आणि बाबूजींची चाल व स्वर म्हणजे, परस्परांच्या ज्योतीने परस्परांच्या तेजाची केलेली आरतीच म्हणावी लागेल. कारण या दोघांच्या प्रतिभेशिवाय हा गीत रामायणाचा महायज्ञ अपूर्णच आहे. वाल्मिकींनी रामायण रचलं. पण राम हे तत्त्व नव्याने सांगण्याचं कार्य केलं, ते आधुनिक वाल्मिकी गदिमांनी. तर हे तत्त्व घराघरात श्रवणीय केलं, ते बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांनी. १९५५ साली तयार झालेलं हे तत्त्व रामायणाप्रमाणेच चिरकाल आणि चिरंतन राहील यात काहीच शंका नाही. पण एखादं तत्त्व जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते सहजासहजी येत नाही. वाल्मिकींना घोर तपश्चर्येनंतर रामायण स्फुरलं, तसाच गीत रामायणातील रामजन्म सुद्धा सहजासहजी झाला नाही. गीत रामायण या कलाकृतीबद्दलचे किस्से हे सुद्धा एक वेगळा अनुभव देणारे आहेत. राम नवमीच्या निमित्ताने त्याच किस्स्यांची आठवण ताजी करुन हा सोहळा अनुभवण्यासाठीचा हा एक प्रयत्न…

रामजन्मापूर्वीच्या प्रसूतीवेदना

गजानन दिगंबर माडगूळकर… म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके महाकवी गदिमा… आता आपण त्यांना प्रेमाने महाकवी म्हणतो, पण ते स्वतःच स्वतःला आपल्या धिप्पाड शरीरयष्टीमुळे ‘महाकाय कवी’ म्हणत असत. स्वतःलाच दिलेल्या एका महान उपमेबद्दल कुठलाही अभिमान न बाळगता, आपल्याला सामांन्यातीलच एक समजण्याचा गदिमांचा निरागस स्वभाव, त्यांनी केलेल्या या शाब्दिक कोटीतून अनुभवाला येतो. गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांनी गीत रामायणाच्या प्रवासाबाबत असंख्य किस्से पुस्तक रुपात लिहून ठेवले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रामजन्माच्या गाण्याच्या वेळचा किस्सा. ‘राम जन्मला गं सखे, राम जन्मला’ हे गाणं तयार करताना, गदिमांच्या डोक्यात विचारांचा प्रचंड संघर्ष होत होता. हे गाणं लिहिण्याचा गदिमा दिवसभर प्रयत्न करत होते, पण काही केल्या त्यांना गाणं सूचत नव्हतं. रात्र झाली तरीही गाणं काही तयार होईना. त्यामुळे गदिमा प्रचंड अस्वस्थ झाले. अस्वस्थतेतच ते रात्री येरझा-या घालत होते. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांची ती बेचैनी ताडली आणि त्यांना गंमतीने विचारलं, इतके अस्वस्थ दिसताय, रामजन्म झाला नाही वाटतं अजून? तेव्हा गदिमा म्हणाले की, हा कुण्या गजानन दिगंबर माडगूळकराचा जन्म नाही, साक्षात प्रभू रामचंद्राचा जन्म आहे. तेव्हा इतक्या प्रसूतीवेदना ह्या होणारच. इतक्या अस्वस्थतेत सुद्धा त्यांच्यातल्या विनोदी स्वभावाचा प्रत्यय या त्यांच्या उत्तरातून नक्कीच येतो.

कुंभकर्णाचे गाणे गाताना बाबूजींनी केली अनोखी युक्ती

बाबूजींनीही गदिमांच्या शब्दांना कायमच अत्यंत समर्पक अशी चाल दिली. त्यांच्या आवाजातील तो गोडवा, प्रत्येक शब्दाचा अर्थपूर्ण उच्चार ही तर बाबूजींची खासियत. मराठीतल्या ‘ष’ आणि ‘श’ या शब्दांच्या उच्चारांबाबत आजही अनेक जण अज्ञात आहेत. पण या शब्दांचा योग्य उच्चार बाबूजी आपल्या गाण्यातून स्पष्टपणे दाखवून देत असत. भावगीतांच्या विश्वातील बाबूजी म्हणजे अजिंक्यताराच. गीत रामायणाच्या बाबतीत बाबूजींची ताकद म्हणजे त्यांनी प्रत्येक गाण्याची, त्या गाण्यातील प्रसंगाच्या वेळेनुसार चाल बांधली. त्या गाण्यातला प्रसंग कोणत्या प्रहराचा आहे, त्यानुसार त्या-त्या रागात त्यांनी ती गाणी स्वरबद्ध केली आहेत. त्यांचे चिरंजीव ज्येष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांनी बाबूजी गाण्यातील पात्रानुसार आवाजात कसं वैविध्य साधायचे, याबद्दल एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. कुंभकर्णाचं गाणं म्हणताना साक्षात त्यांनी माईक समोर एक भला मोठा कर्णा ठेवला आणि ते गाणं गायलं. आता हे असं करण्यामागचं कारण म्हणजे, कुंभकर्ण हा राक्षस… त्यामुळे त्याचा आवाज हा भसाडा असणं अपेक्षित आहे. त्यामुळेच त्यांनी ‘योग्य समयी जागविले बांधवा मला, लंकेवर काळ कठीण आज पातला…’ हे कुंभकर्णाचं गाणं ध्वनिमुद्रीत करताना ही युक्ती केली होती. शूर्पणखेचे नाक आणि कान छाटून टाकल्यानंतर तिचं दुःख आणि संताप यांचं अचूक मिश्रण, बाबूजींनी आपल्या गळ्यातून दाखवून दिलं आहे. प्रत्येक गाण्याच्या बाबतीत त्यांनी केलेल्या या क्लृप्त्यांमुळेच प्रत्येक गाणं हे केवळ श्रवणीयचं नाही, तर प्रेक्षणीयही होतं. इतका सूक्ष्म अभ्यास असतो त्याचवेळी एखादी कलाकृती अजरामर होते.

गदिमांच्या अनुवादासमोर मूळ कविताच पडली फिकी

आघाडीचे दिग्दर्शक रघुनंदन बर्वे यांच्याबरोबर प्रवासात असताना, त्यांनी मला गदिमांचा फार कमी जणांना माहीत असलेला एक किस्सा सांगितला. तो ऐकून मी काही क्षण स्तब्धच झालो. ज्येष्ठ दिग्दर्शक मधुकर पाठक यांनी एका वर्तमानपत्रातील लेखात लिहिलेला हा किस्सा. एकदा गदिमांकडे एक उत्तर भारतीय कवी आला आणि गदिमांना मोठ्या आविर्भावात म्हणाला,

कवी- मैंने सुना हैं आप शीघ्र कवी हैं…

गदिमा- ऐसे लोग कहते हैं… मैं तो ऐसा नही मानता

कवी- नही लेकिन मैंने आपकी बहुत तारीफ सुनी हैं.. तो क्या आप मेरी एक कविता का तुरंत मराठी अनुवाद करके बता          सकते हैं?

गदिमा- सुनाईये… कोशिश करता हूँ…

कवी- (कविता ऐकवतो)

रातभर रहियो, सबेरे चले जैय्यो
मिलनेवालों के यहाँ क्या काम हैं जलनेवालों का?

हे ऐकल्यानंतर गदिमा काही क्षण डोळे मिटून शांत बसले. डोळे उघडताक्षणीच त्यांनी या गाण्याचा मराठी अनुवाद सांगितला,

रात्रभर राहावा, झुंजुरका (पहाटेच्या वेळी) तुम्ही जावा
शेजेशी समई लावू कशाला,
जुळत्या जिवांशी जळती कशाला,
इश्काचा मजा तुम्ही घ्यावा,
रात्रभर रहावा, झुंजुरका तुम्ही जावा…

हा अनुवाद ऐकल्यानंतर त्या कवीने गदिमांचे पाय धरले आणि चालता झाला. कारण त्याला हे कळून चुकले की, आपल्या मूळ कवितेपेक्षा गदिमांचा अनुवादच अधिक श्रेष्ठ आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here