पुरुषांनो सावध रहा! सोशल मीडियावरील ‘चॅट’, लावेल तुमची ‘वाट’

अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, तिच्या मेसेजला रिप्लाय देऊ नका, नाहीतर...

78

सोशल मीडियावर एखाद्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली की काही पुरुष मंडळी एकदम हुरळून जातात. ती महिला जर चॅटिंग करायला लागली तर पुरुष मंडळींना आनंदाच्या उकळ्या फुटून ते एकदम उडायलाच लागतात. पण त्यांचा हा उतावीळपणा कधीकधी त्यांना चांगलाच भारी पडू शकतो. त्यामुळे पुरुषांनो, सोशल मीडियावर कुठल्याही अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, तिच्या मेसेजला रिप्लाय देऊ नका, नाहीतर तुम्ही देखील होऊ शकता सेक्सटॉर्शनचे शिकार…

सायबर गुन्हेगारीची व्याख्या बदलत चालली आहे, लोकांकडून पैसे उकळण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडिया हे शस्त्र उपसले आहे. या शस्त्राच्या धाकावर सायबर गुंडांनी लूटमार सुरू केली आहे. या लुटमारीला अनेक जण बळी पडले आणि बळी पडत आहेत. बँकेच्या नावावर पैसे उकळणाऱ्या टोळ्यांचे पितळ उघडे पडल्यानंतर त्यांनी नवनवीन क्लृुप्त्या लढवत सर्वसामान्यांची लूट सुरू केली आहे. यामध्ये केवळ सर्वसामन्याच नाही तर व्यापारी, डॉक्टर, वकील, पोलिस सरकारी अधिकारी आणि काही नेतेमंडळी देखील बळी पडत आहेत.

(हेही वाचाः फेसबूकवरील मित्राच्या ‘फेक’ बोलण्याला महिला पोलिस अधिकारी भुलली! आणि मग…)

रिक्वेस्ट पाठवून होते फसवणूक

सायबर गुन्हेगारांनी सध्या नवीनच फंडा वापरण्यास सुरूवात केली आहे. जे पुरुष मंडळी सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहून महिला, तरुणींसोबत मैत्री करुन त्यांच्यासोबत गप्पांच्या मैफिली रंगवतात, अशा पुरुषांना सायबर गुंडांकडून हेरले जात आहे. सोशल मीडियावर एखाद्या सुंदर महिलेचा अथवा तरुणीचा फोटो वापरुन बोगस खाते उघडले जात आहे. पुरुषांचे सोशल मीडियावर प्रोफाइल बघून त्यांना सोशल मीडियाच्या बोगस खात्यावरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात येते. महिलेचा फोटो बघून पुरुष मंडळी देखील महिलांकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात आणि मग सुरू होते चॅटिंग.

(हेही वाचाः डार्कनेटची ‘काळा कांडी’: हे नक्की वाचा… नाहीतर तुम्हीही येऊ शकता गोत्यात)

असे होते सेक्सटॉर्शन

मधाळ बोलणाऱ्या या महिलांच्या जाळ्यात अडकणाऱ्या पुरुषांचा व्हॉट्सअप नंबर मिळवला जातो. त्यानंतर या क्रमांकावर व्हिडिओ कॉल करुन, एक महिला तुमच्यासोबत चॅटिंग करत स्वतःचे कपडे उतरवते. त्यानंतर ती तुम्हाला देखील कपडे काढण्यास विनंती करते. तुमचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर सुरू होते ‘सेक्सटॉर्शन’… या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ब्लॅकमेल करुन तुमच्याकडून पैसे उकळण्यात येतात.

वाढत आहेत गुन्हे

मुंबईत सेक्सटॉर्शन च्या घटनेत वाढ झाली असून, अनेक जण याला बळी पडत आहेत. मुंबई पोलिसांच्या एन.एम.जोशी मार्ग पोलिसांनी अशाच एका टोळीला राजस्थान भरतपूर येथून अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सेक्सटॉर्शनचे गुन्हे हे राजस्थान मधील भरतपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असून, हे गाव दिल्ली आणि राजस्थानच्या मध्यभागी असल्यामुळे हद्दीच्या वादातून नेहमीच वाद सुरू असल्यामुळे येथील गुन्हेगारांचे चांगलेच फावते.

(हेही वाचाः फेसबूक अकाऊंट हॅक झाल्यावर काय कराल? ‘या’ स्टेप्स करा फॉलो)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.