ऐन नोव्हेंबर महिन्यात राज्यात अवकाळी पावसाचा मारा सुरु असताना पुन्हा डिसेंबर महिन्यातही राज्यात अवकाळी पावसाचं आगमन होणार आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस उद्यापासून सुरु होईल. संपूर्ण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात ३० नोव्हेंबरपासून वा-यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणार आहे, राज्यातील अवकाळी पावसासाठी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाचा अंदाज
मंगळवारपासून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीत, अहमदनगर, पुणे तसेच धुळे, नंदुरबार, नाशिकमध्येही गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होईल. मुंबईत केवळ दोन दिवसच हा प्रभाव राहील, तर गुरुवारी केवळ हलका पाऊस राहील. सिंधुदुर्गात मंगळवारनंतर पावसाचा जोर ओसरेल. जळगावात मंगळवारी हलक्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी पावसाला जोर वाढेल. मात्र कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबादमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील. शुक्रवारपासून राज्यातील बहुतांश भागांत हलका पाऊस राहील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
( हेही वाचा : १ डिसेंबरपासून हार्बर मार्गावर कोणते होणार बदल? वाचा… )
अवकाळी पावसाचं कारण
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय. त्यात उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालाय. या दोन्ही स्थितींमुळे राज्यात अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
मच्छिमारांनो, समुद्रात जाऊ नका
२-३ डिसेंबर रोजी अरबी समुद्रातील वा-यांचा वेग ६५ किलोमीटर ताशी वेगाने वाहणार आहे. किनारपट्टी भागांतील मच्छिमारांना या दिवसांत समुद्रात न जाण्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.
Join Our WhatsApp Community