सर्वसामान्यांसाठी मुंबईत हक्काचं घर अशी ओळख असलेल्या म्हाडाच्या घरांसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. आगामी काही दिवसात मुंबई म्हाडा लॉटरीची सर्वसामान्य वाट पाहत असताना म्हाडा एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहे. म्हाडाच्या लॉटरी करता आपल्याला काही रक्कम डिपॉझिट करावी लागते. या डिपॉझिट रक्कमेसंदर्भात म्हाडा आता महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठीच्या अनामत रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव म्हाडाच्या विचाराधीन आहे.
(हेही वाचा – …तर LPG गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही! काय आहे कारण?)
या सोडतीसाठीच्या अनामत रक्कमेत वाढ करण्याच्या प्रस्तावाबाबत म्हाडा प्राधिकरण आणि मुंबई मंडळाकडून चाचपणी सुरू आहे. ही रक्कम नेमकी किती असावी, यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या म्हाडाच्या घरांच्या एकूण रक्कमेच्या ५ ते १० टक्के इतकी अनामत रक्कम वाढविण्याचा म्हाडा विचार करत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, म्हाडाची संपूर्ण सोडत प्रक्रिया बदलण्याचे काम सध्या प्राधिकरणाकडून सुरू आहे. सोडतीतील भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत. सोडतीसाठी करण्याच्या अर्जासोबत अर्जदारांना उत्पन्न गटाप्रमाणे अनामत रक्कम (डिपॉझिट) भरावी लागते. तर या सोडतीत अपयशी ठरलेल्यांना सोडतीनंतर काही दिवसांत ही अनामत रक्कम परत केली जाते.
सध्या किती डिपॉझिट द्यावे लागते?
विजेत्यांची अनामत रक्कम घरांच्या किमतीच्या रक्कमेत समाविष्ट केली जाते. सध्या मुंबई ठाण्याच्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी अत्यल्प गटासाठी ५ हजार, अल्प गटासाठी १० हजार, मध्यम गटासाठी १५ हजार आणि उच्च गटासाठी २० हजार रूपये अशा अनामत रक्कम आहे. या अनामत रक्कमेनुसार मुंबई मंडळाची शेवटची २०१९ ची सोडत काढण्यात आली होती. मात्र आता या अनामत रक्कमेत बदल आणि वाढ होण्याची शक्यता आहे.
किती वाढणार डिपॉझिट रक्कम?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत घराच्या एकूण रक्कमेच्या ५ ते १० टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून घेण्याचा विचार करत असून लवकरच यासंबंधीत निर्णय होणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community