म्हाडा टेंडर प्रकरणातून एका ठेकेदारावर झालेल्या गोळीबार प्रकरणात संबंधित अधिका-यांकडे देखील चौकशी होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गोळीबार प्रकरणात कुर्ला आणि गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाईत आतापर्यंत ७ जणांना अटक केली असून त्यात एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
दहिसर पूर्व येथे राहणारे सरकारी ठेकेदार सूरज प्रतापसिंग देवडा यांच्यावर कुर्ला पश्चिम येथे गेल्या आठवड्यात गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात ठेकेदार सुरज देवडा हे थोडक्यात बचावले, या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि हत्यारबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा हल्ला म्हाडाच्या कामाचे टेंडर मागे घेण्याच्या वादातून करण्यात आला होता, हे देवडा यांनी दिलेल्या जबाबात स्पष्ट झाले आहे. हल्ल्यापूर्वी देवडा यांनी हे टेंडर मागे घ्यावे यासाठी त्यांना वारंवार समीर सावंत आणि गणेश चुगल या दोघांकडून फोनवर धमकी देण्यात येत होती, अशी माहिती देवडा यांनी पोलिसांना दिली.
कुर्ला पोलिसांनी सावंत आणि चुगल यांच्यासह अनोळखी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करून आतापर्यंत ७ जणांना अटक केली असून, समीर सावंत आणि गणेश चुगल अद्यापही फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन जण हल्लेखोर असून उर्वरित आरोपींचा या कटात सहभाग आहे.
( हेही वाचा:दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परिक्षेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी बोर्डाचा मोठा निर्णय )
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर आणि गणेश हे दोघे म्हाडा व इतर सरकारी कामाच्या टेंडरमध्ये ढवळाढवळ करून सरकारी कामाचे टेंडर कंत्राटदारांना मिळवून देत असे व मोबदल्यात टक्केवारी घेत असे. या टेंडर प्रकरणात संबंधित सरकारी अधिकारी गुंतल्याची शक्यता आहे. सावंत आणि चुगल या दोघांच्या अटकेनंतर अधिका-यांचे नाव पुढे येऊन त्यांचे पितळ उघडे पडेल अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. देवडा यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात तसेच त्यांनी भरलेल्या म्हाडाच्या कामाच्या संदर्भात म्हाडाचे संबंधित अधिकारी आणि संबंधित इतर ठेकेदार यांच्याकडेदेखील चौकशी करण्यात येणार असून त्यांचे जबाब नोंदवले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community