ऐतिहासिक निर्णय! सौरभ कृपाल देशातील पहिले ‘समलैंगिक’ न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस केली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच भारताला समलैंगिक न्यायाधीश लाभणार आहे. सौरभ कृपाल यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी एससी कॉलेजियमने अधिकृतपणे शिफारस करण्याची ही दुसरी वेळ आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २०१७ मध्ये सौरभ कृपाल यांच्या पदोन्नतीसाठी शिफारस केली होती.

कॉलेजियमने केली निवड

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ११ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या बैठकीत सौरभ कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारताचे सरन्यायाधीश रमणा यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने कृपाल यांची निवड केली असून, ऐतिहासिक नवतेज सिंग जोहर खटल्यातील कृपाल हे प्रमुख वकिलांपैकी एक होते. कॉलेजियममध्ये न्यायमूर्ती उदय यू ललित, एएम खानविलकर, डीवाय चंद्रचूड आणि एल नागेश्वर राव यांचाही समावेश आहे. यावर माजी ऍटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, कृपाल यांची पदोन्नती दीर्घकाळ प्रलंबित होती. हा सर्वात हुशार वकिलांपैकी एक आहे आणि मला त्याच्या बुद्धीचा आणि मेहनतीचा वैयक्तिक अनुभव आहे. मी, म्हणेन ‘देर आये दुरस्त आये’ असा हा निर्णय आहे.

( हेही वाचा : मुंबईची होतेय दिल्ली? काळजी घ्या, मुंबईची हवा दिल्लीपेक्षा ‘विषारी’ )

कोण आहेत सौरभ कृपाल?

सौरभ कृपाल हे न्यायमूर्ती बीएन कृपाल यांचे पुत्र आहेत, जे भारताचे ३१ वे सरन्यायाधीश होते. सौरभ यांनी सेंट स्टीफन्स, दिल्ली विद्यापीठातून भौतिकशास्त्रात बीएससी (ऑनर्स) पूर्ण केले आणि त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. सौरभ कृपाल यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर शिक्षणही घेतले आहे. भारतात परतण्यापूर्वी सौरभ कृपाल यांनी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांमध्ये काही काळ काम केले. दोन दशकांहून अधिक काळ ते भारतात कायद्याचा सराव करत आहेत. कृपाल हे उघडपणे समलैंगिक आहेत आणि LGBTQ च्या हक्कांसाठी कायम लढा देतात. त्यांनी ‘सेक्स अँड द सुप्रीम कोर्ट’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here