२८ फेब्रुवारी रोजी सैन्य भरतीसाठी प्रवेश परीक्षा होणार होती, मात्र परीक्षेच्या आधीच या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर सैन्यातील गुप्तचर विभाग आणि पुणे गुन्हे शाखा यांनी या प्रकरणी मेजर थिरु मुरुगन (४७) याला अटक केली होती. बुधवारी, १० मार्च रोजी पोलिसांनी आणखी एका मेजर पदावरील अधिकारी वसंत किलारी (४५) याला अटक केली. त्याला अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस.आर. नवंदर यांनी १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक होताच किलारी म्हणाला फोन पडला पाण्यात!
यावेळी न्यायालयात युक्तीवाद करताना सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांनी सांगितले कि, अटक करण्यात आलेला मेजर थिरु मुरुगन याच्याच बॅचमधील मेजर किलारी आहे. मेजर किलारी हा रेकॉर्ड ऑफिसर म्हणून पोस्टिंगवर आला होता. त्याने प्रश्नपत्रिका थंगवेलु याला पाठवली, त्याने ती भारत अडकमोल याला पाठवली, जो या प्रकरणातील सात आरोपींपैकी एक आहे. मेजर किलारी याला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना त्यांचा फोन पाण्यात पडल्याचे सांगितले, मात्र पोलिसांनी त्याचा फोन घेऊन त्यातील सर्व डेटा ताब्यात सुरक्षित करून घेतला.
(हेही वाचा : मेजरनेच सैन्य भरती परीक्षेचा फोडला पेपर! आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली!)
काय आहे हे नेमके प्रकरण?
- २८ फेब्रुवारी रोजी सैन्य भरतीसाठी प्रवेश परीक्षा होणार होती, मात्र त्याच्या काही तासांच्या आधीच मेजर मुरुगन याने त्याच्या फोनवरून प्रश्नपत्रिका दुसऱ्याला पाठवली.
- हा प्रकार लक्षात येताच सैन्याने ताबडतोब परीक्षा थांबवली. त्यानंतर सैन्याच्या गुप्तचर विभाग आणि पुणे गुन्हे विभाग यांनी संयुक्तपणे तपास केला.
- विविध ठिकाणी मागच्या आठवड्यात धाडी टाकल्या. शनिवारी पोलिसांनी मेजर मुरुगन याला तामिळनाडू येथील सैन्याच्या तळावरून अटक केली.
- रविवारी त्याला अधिकृत अटक करण्यात आली आहे. त्याला सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.आर. नवंदर यांनी मुरुगन याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
- पोलिसांनी मेजर मुरुगन याच्यावर लाचलुचपत प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघडकीस येताच वनवाडी आणि विश्रांतवाडी या दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात माजी सैन्य दलातील कर्मचाऱ्यासह तीन जणांना अटक करण्यात आली.
- तर वनवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी २ आजी सैन्य दल कर्मचारी यांच्यासह दोन जणांना अटक करण्यात आली.
- बुधवारी, १० मार्च रोजी पोलिसांनी आणखी एका मेजर पदावरील अधिकारी वसंत किलारी (४५) याला अटक केली.