‘बेस्ट’च्या ५ आगारांतील ‘मिनी’ बससेवा ठप्प, प्रवाशांची गैरसोय

168

बेस्टच्या अनेक सेवा कंत्राटी पद्धतीने सुरू असून यातील काही कंत्राटदार नियमांचे उल्लंघन करत असल्याने बेस्टच्या ५ पेक्षा अधिक आगारांतील मिनी बससेवा २ सप्टेंबरपासून ठप्प असल्याचे समोर येत आहे. एमपी ग्रुपकडून चालवली जाणारी बेस्टच्या ५ आगारांतील मिनी बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे बेस्टने एमपी ग्रुप अँड कंपनीवर कारवाई करत कंपनीला नोटीस बजावली असून ३ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

(हेही वाचा – Ganeshotsav 2022: पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन, मुंबईसह राज्यात प्रशासनाची जय्यत तयारी)

बेस्टच्या कित्येक सेवा या कंत्राटी पद्धतीने सुरू असून एमपी ग्रृपकडून मिनी बस सेवा बेस्टच्या ५ पेक्षा अधिक आगारांतून सुरू आहे. कुर्ला, वडाळा, वांद्रे, विक्रोळी आणि कुलाबा बस आगारांचा यामध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमपी ग्रुपकडून या आगारांमध्ये २७५ बस चालवल्या जात असून त्यासाठी ७५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे; मात्र अनेक बस गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. काही बसगाड्यांमध्ये एसी बंद आहेत. काहींचे दरवाजे खराब झाले आहेत; तर काही गाड्यांच्या इंजिनमध्ये समस्या आहेत. या गाड्यांचा मेंटेनन्सदेखील कंत्राटदारालाच करायचा असून त्यांच्याकडून तो केला जात नसल्याचे समोर येत आहे.

वरील पाच आगारांपैकी फक्त कुलाबा आगारातील १० बसची सेवा सध्या सुरू आहे. बाकी बसेसची सेवा ठप्प आहे, त्यामुळे ७० बस गाड्या इतर आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत. ७५० पैकी ५०० कर्मचारी कामावर येत असून त्यांनाही ३ ते ४ महिने पगार दिलेला नाही. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.