१ डिसेंबरला पावसाने धमाका केल्यानंतर हळूहळू आता पावसाचा जोर कमी होतो आहे. शुक्रवारी किमान तापमान २१ अंश सेल्सिअसवर नोंदवलं गेलं आहे. सरासरीच्या तुलनेत हे किमान तापमान दोन अंशाने जास्त आहे. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी मुंबईकरांनी सूर्यदेवाचं दर्शन घेतलं. शनिवारी पावसाची हलकी सर अपेक्षित असली तरीही रविवारी पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे.
तापमानात वाढ होण्याची शक्यता
येत्या दिवसांत कमाल आणि किमान तापमानात एक-दोन अंशाने वाढ होण्याची शक्यता असल्याने हुडहुडणा-या थंडीसाठी मुंबईकरांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसाच्या गैरहजेरीने डुबकी मारलेल्या कमाल पा-यानेही आता पुन्हा उडी मारली आहे. कमाल पारा २६ अंश सेल्सिअसवरुन आता ३० अंश सेल्सिअसवर आला आहे. रविवारपर्यंत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर राहील.
( हेही वाचा : गोदाकाठी साहित्याचं महाकुंभ! आजपासून 94 व्या मराठी साहित्य संमेलनाचा ‘श्रीगणेशा’ )
वेधशाळा अधिकाऱ्यांची माहिती
दरम्यान, राज्यातील किमान तापमानाचा पारा आता वाढत असल्याची नोंद भारतीय हवामान खात्यानं केली आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची हलकी सर राहील. मात्र तापमान खाली उतरणार नसल्याचे वेधशाळा अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारपासून कोकणातील किमान तापमानात केवळ एक ते दोन अंशाने वाढ झालेली दिसून येतेय, मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानातील वाढ तीन अंशाने तर मराठवाड्यातही तीन ते चार अंशाने किमान तापमान वाढल्याचं दिसून येत आहे. विदर्भातील किमान तापमान डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवलं जाते. मात्र विदर्भात अद्यापही म्हणावी तेवढी तापमानात घट नोंदवली जात नाही आहे.
Join Our WhatsApp Community