भूमिगत जल बोगद्याच्या कामात ‘मुंबई’चा जगात दुसरा क्रमांक!

133

किनारी रस्ता प्रकल्पाने भूमिगत बोगदा खणन करण्याची विक्रमी कामगिरी करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने भूमिगत जलबोगदा खणन कामातही विक्रमी कामगिरी बजावली आहे. अमरमहाल ते परळ जलबोगदा कामामध्ये एका महिन्यात तब्बल ५२६ मीटर खणन केले असून एका दिवसात ४० मीटर खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा महापालिकेने साध्य केली आहे. या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर, १०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे भूमिगत पाणीपुरवठा बोगदे असणारे मुंबई हे जगातले दुसरे शहर ठरणार आहे. सध्या फक्त न्यूयॉर्क शहरातच १०० किलोमीटर पेक्षा अधिक अंतराचे भूमिगत जलबोगदे आहेत.

अमरमहाल ते परळ ९.६८ किलोमीटर लांबीचा बोगदा

मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याच्या वतीने पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत. अमरमहाल ते परळ हा सुमारे ९.६८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण विभागांमध्ये तसेच ई आणि एल विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यास मदत करणार आहे. तर अमरमहाल ते ट्रॉम्बे उच्च पातळी जलाशयापर्यंत जाणारा दुसरा बोगदा हा सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा असून त्याद्वारे एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे.

महापालिकेची विक्रमी कामगिरी!

tunnel 1

हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर बांधण्यात येत असून त्यांचा व्यास ३.२ मीटर इतका आहे. या दोन्ही बोगद्यांमधून येणाऱ्या भूमिगत जलवाहिन्या ह्या भूपृष्ठावरील मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर स्थित दोन मुख्य जलवाहिन्यांमधून येणारे पाणी या बोगद्यांद्वारे पुढे जाणार आहे. या भूमिगत जलबोगद्यांसाठी ‘टेराटेक’ कंपनीचे बोगदा खणन यंत्र कार्यान्वित आहे. या संयंत्राने नुकतीच विक्रमी कामगिरी साध्य केली आहे. अमरमहाल ते परळ या पहिल्या भूमिगत जलद बोगद्याच्या कामामध्ये डिसेंबर २०२१ या एकाच महिन्यात तब्बल ५२६ मीटर खणन पूर्ण करण्यात आले होते. बोगद्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या ८५ दिवसांच्या कालावधीत सुमारे एक किलोमीटरचे खणन पूर्ण करण्याची कामगिरी यामुळे साध्य झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञांकडून महानगरपालिकेचे कौतुक केले जात आहे.

(हेही वाचा – महिन्याला चर बुजवण्यासाठी मुंबई महापालिका खर्च करते ‘ इतके’ कोटी रुपये)

tunnel 1

एवढेच नव्हे तर अमरमहाल ते ट्रॉम्बे या दुसऱ्या बोगद्याचे एकूण २.७५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजेच त्याचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाची सुरुवात ६ मार्च २०२१ रोजी राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. दोन्ही जलबोगद्यांची कामे वेगाने सुरु असून कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती असतांनाही या दोन्ही बोगद्यांच्या कामांमध्ये प्रशासनाने खंड पडू दिलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही भूमिगत जलबोगदे ठरलेल्या मुदतीत म्हणजे अनुक्रमे सन २०२६ आणि २०२४ मध्ये पूर्णत्वास जातील. एवढेच नव्हे तर चेंबूर ते वडाळा या अंतराचा अंशतः बोगदा सन २०२५ मध्ये सुरू होऊ शकेल,असा विश्वास अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.