1 मे 2021 पासून जगातील सगळ्यात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आरोग्य मंत्रालयामार्फत ऑनलाईन लसीकरण नोंदणीला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना, आता लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारकडून देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 16 करोड लसींचा मोफत पुरवठा करण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला सर्वात जास्त लसींचा पुरवठा झाला असल्याची माहिती मिळत आहे.
आरोग्य मंत्रालयाची माहिती
केंद्र सरकारकडून आतापर्यंत 16 करोड 16 लाख 86 हजार लसींचा राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना पुरवठा करण्यात आला आहे. यापैकी 15 करोड 10 लाख 77 हजार लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले असून, 1 करोड 6 लाख 8 हजार लसींचा पुरवठा अजून राज्यांकडे शिल्लक असल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. येत्या तीन दिवसांत अजून 20 लाख लसींचा पुरवठा देशातील सर्व राज्यांना करण्यात येणार असल्याचेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
Govt. of India has so far provided more 16.16 crore vaccine doses to States/UTs Free of Cost.
More than 1 crore doses are still available with the States/UTs to be administered.https://t.co/3ByjTEhfbc pic.twitter.com/LqW0P5hp5C
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) April 29, 2021
(हेही वाचाः सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद… अवघ्या काही तासांत ‘इतक्या’ नागरिकांनी केली नोंदणी!)
महाराष्ट्राला सर्वाधिक लसींचा पुरवठा
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला करण्यात येणा-या लसींच्या पुरवठ्यावरुन राजकारण फार तापले होते. महाराष्ट्राला लसींचा मर्यादित पुरवठा होत असल्याचे सांगत, महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे अंगुलीनिर्देश केला होता. पण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील इतर सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक लसींचा पुरवठा झाल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्राला 28 एप्रिलपर्यंत एकूण 1 करोड 63 लाख 62 हजार लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. त्यापैकी 1 करोड 56 लाख 12 हजार लसींचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले असून, 7 लाख 49 हजार लसींचा साठा महाराष्ट्राकडे शिल्लक असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
या राज्यांच्या तुलनेत जास्त पुरवठा
देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश राज्यापेक्षाही महाराष्ट्राला सर्वाधिक लसींचा पुरवठा झाल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सांगते. उत्तर प्रदेशची सध्याची लोकसंख्या ही 22 करोड 96 लाख 72 हजार इतकी असून, उत्तर प्रदेशला आतापर्यंत 1 करोड 37 लाख 96 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 करोड 39 लाख 61 हजार इतकी असून, महाराष्ट्राला आतापर्यंत 1 करोड 63 लाख 62 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. बिहारची लोकसंख्या ही साधारणपणे महाराष्ट्राइतकीच असून, तिथे केवळ 79 लाख 50 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला असल्याचे, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
(हेही वाचाः १ मेपासून तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण नाही! आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती )
महाराष्ट्रात 1 मेपासून तिस-या टप्प्याचे लसीकरण नाही
२८ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त लसीकरणावर चर्चा झाली, त्यानुसार लसीकरणाच्या निर्णायक टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांचे मोफत लसीकरण करणार आहे. त्यासाठी 2 कोटी डोस राज्य सरकार विकत घेणार आहे. यासाठी 6 हजार 500 कोटी रुपये राज्य सरकारला खर्च होणार आहे. लसीकरण पुढील 6 महिन्यांत पूर्ण करणार आहे. मात्र 1 मे रोजी लसीकरण सुरू होणार नाही, आपल्याला सबुरीने घ्यावे लागेल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः खुशखबर! राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण!)
Join Our WhatsApp Community