रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील १९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यासाच्या आधारावर या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील दादरसह ७ रेल्वे स्थानकांचा समावेश असून राज्यातील पुणे, नाशिक, नांदेड, अमरावती, भुसावळ या प्रमुख रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे लवकरच या सर्व १९ रेल्वे स्थानकांचा मेकओव्हर झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
या रेल्वे स्थानकांचा होणार मेकओव्हर
अकोला, अंधेरी, अमरावती, बांद्रा टर्मिनस, भुसावळ, बोरिवली, दादर, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणावळा, मिरज, नांदेड, नाशिक रोड, पुणे, साईनगर शिर्डी, शिवाजीनगर पुणे, ठाकुर्ली, वर्धा रेल्वेस्थानकांचा पुनर्विकासासाठी अभ्यास करण्यात येणार आहे.
राज्यसभेत रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असे सांगितले की, या रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार आहे. या कामांमध्ये महत्त्वाची शहरे आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
राज्यातील १०८ स्थानकांचा समावेश
यापूर्वीच आदर्श स्थानकांच्या योजनेत महाराष्ट्रातील १०८ रेल्वेस्थानकांचा विकास करण्यात आलेला आहे. देशभरात आदर्श रेल्वे स्थानक योजनेत १ हजार २५२ स्थानकांची निवड करण्यात आली. त्यापैकी १ हजार २१८ स्थानके आजवर विकसित करण्यात आली आहेत. उर्वरित स्थानकांचा जून २०२३ पर्यंत विकास करण्यात येणार आहे.