शक्ती मिल गँगरेप प्रकरण संपूर्ण देशात गाजले. यामधील आरोपींपैकी ज्या आरोपीला अल्पवयीन म्हणून सहानुभूती मिळाली, त्याच आरोपीने आता पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. गँगरेप प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर चिल्लरमध्ये खंडणी वसूल करणारा आकाश जाधव उर्फ गोट्या, हा लाखोंच्या खंडण्या उकळू लागला आहे. मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत मागील काही वर्षांत आकाशवर खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण करणे, खंडण्या उकळणे, अशा एकूण १२ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
१२वा गुन्हा दाखल
आकाश उर्फ गोट्या याच्यावर ताडदेव पोलिस ठाण्यात नुकताच १२वा गुन्हा दाखल झाला आहे. आकाशच्या आदेशावरुन त्याच्या टोळीतील गुंडाने एका इव्हेंट मॅनेजरची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वडाळा येथील एका पुनर्वसन प्रकल्पाच्या वादातून हा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आकाश आणि त्याच्या टोळीवर ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
(हेही वाचाः परप्रांतीय नोकरांपासून सावधान! विश्वास संपादन करून करीत आहेत चोऱ्या!)
बलात्काराचा गुन्हा दाखल
आग्रीपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या जे.आर.बोरीचा मार्ग येथील धोबीतलाव झोपडपट्टीमध्ये राहणारा आकाश जाधव याने, ऑगस्ट २०१३मध्ये महालक्ष्मी येथील शक्ती मिल या बंद पडलेल्या मिलच्या कंपाऊंड मध्ये एका फोटो जर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात आकाशसह सिराज खान, सलीम अंसारी, मोहम्मद कासिम(कासिम बंगाली) आणि विजय जाधव या पाच जणांचा समावेश होता. शक्ती मिल गँगरेप प्रकरण संपूर्ण देशात गाजले होते. या प्रकरणानंतर भांडुप येथे राहणारी आणखी एक तरुणी तक्रार देण्यासाठी पुढे आली. तिच्यावर देखील या पाच जणांपैकी इतर तिघांनी शक्ती मिल कंपाऊंडमध्ये बलात्कार केल्याचे समोर आले होते.
अल्पवयीन आरोपी म्हणून सुटका
ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, या आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखा तसेच पोलिस ठाण्याची विविध पथके तयार करण्यात आली होती. अखेर या पाचही आरोपींना अटक करण्यात आली. या पाच जणांपैकी आकाश १६ वर्षांचा होता. अल्पवयीन आरोपी म्हणून आकाश याच्यावर बाल न्यायालयात खटला चालवण्यात आला. दरम्यान विधी संघर्ष बालक म्हणून आकाशची जामिनावर मुक्तता झाली. अल्पवयीन आरोपी म्हणून पोलिसांनी आकाश जाधव याच्याकडे दुर्लक्ष केले.
(हेही वाचाः आझाद मैदान दंगल : धर्मांध मुसलमान आरोपी मोकाट, पीडित न्यायाच्या प्रतीक्षेत!)
दहशत निर्माण करण्यासाठी सुरु केली लुटमार
तुरुंगातून आल्यानंतर आकाश स्थानिक दुकानदार, फेरीवाले यांना मारहाण करुन त्यांच्या गल्ल्यातील पैसे लुटू लागला. त्याने त्याच परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना आपल्या सोबत घेऊन स्थानिक नागरिक, पादचारी यांना लुटण्याचे प्रकार सुरू करुन, परिसरात त्याने स्वतःची दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. त्याच्याविरुद्ध आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याला अटक देखील करण्यात आली. मात्र अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तो सतत जामिनावर बाहेर पडू लागला होता.
खंडण्या उकळायला सुरुवात
हळूहळू आकाशने आपली गॅंग तयार केली आणि मोठमोठ्या खंडण्या उकळण्यास सुरुवात केली. मागील काही वर्षांच्या काळात त्याच्यावर तीन खून, मारामारी, खंडण्या, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे दाखल होऊ लागले. त्यातून सुद्धा जामिनावर बाहेर आल्यानंतर, आकाश हा सुपाऱ्या वाजवू लागला. आता तर त्याने आणि त्याच्या टोळीने एक पाऊल पुढे टाकत, काही बांधकाम व्यावसायिकांकडे ते खंडण्या उकळू लागले आहेत. तसेच धमक्या देणे यांसारखे गुन्हे आकाश आपल्या टोळीसोबत करू लागला आहे.
(हेही वाचाः बापरे! पोटातून काढले १० कोटींचे कोकेन कॅप्सूल!)
नवा गुन्हा दाखल
ताडदेव येथे वडाळा येथील विघनहर्ता पुनर्वसन प्रकल्पाच्या वादातून त्याच्या गुंडाने एका इव्हेंट मॅनेजरच्या हत्येची सुपारी घेतली होती. मात्र यामध्ये त्याच्या गुंडाने इव्हेंट मॅनेजरवर शस्त्राने हल्ला केला, त्यात इव्हेंट मॅनेजर बचावला असून, त्याने ताडदेव पोलिस ठाण्यात आकाश आणि त्याच्या टोळीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आकाश आणि त्याच्या टोळीविरुद्ध हा १२वा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
मुंबईवर राज्य करण्याचे स्वप्न
दाऊद, गवळी आणि छोटा राजन यांच्यासारखे बनून आकाशला मोठा गँगस्टर बनून, मुंबईवर राज्य करायचे त्याचे स्वप्न असल्याचे, त्याने अनेक वेळा आपल्या विभागात अनेकांना बोलून दाखवले होते. आकाश त्याच मार्गावर असून, चिल्लरमध्ये हप्ते घेणारा गोट्या आणि त्याची टोळी आता लाखोंच्या खंडण्या उकळू लागली आहे.
(हेही वाचाः कैद्याच्या खोलीत सापडल्या धक्कादायक वस्तू… काय होता कट?)
Join Our WhatsApp Community