भयानक! बेपत्ता आई आणि मुलाच्या वहीत सापडले असे काही, ज्यामुळे…

या वहीच्या पानातील मजकुराचा नेमका अर्थ काय, याचा तपास पोलिस करत आहेत.

कल्याण येथून मागील दोन आठवड्यांपासून घरातून गुढरित्या बेपत्ता झालेल्या माय-लेकरांचा अद्याप काहीही थांगपत्ता लागत नसला, तरी त्यांच्याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेपत्ता मुलाच्या वहीत विचित्र चित्रं काढून त्याच्यावर वेगळ्या भाषेत मंत्रोच्चारासारखे काहीतरी लिहून ठेवण्यात आले आहे. नातेवाईकांनी ही वही पोलिसांच्या ताब्यात दिलेली असून, पोलिस या वहीच्या आधारावर या दोघांचा काही मागमूस लागतो का ते पहात आहेत. बेपत्ता झालेल्या तीन जणांपैकी मुलाच्या आजीचा मृतदेह दुसऱ्याच दिवशी सापडला होता. मात्र, नातू आणि मुलगी अद्यापही बेपत्ता असल्यामुळे यातील गूढ वाढले आहे. हा प्रकार कल्याणच्या खडकपाडा येथे घडला आहे.

काय आहे बेपत्ता होण्यामागचे गूढ?

अनुसया देवकर (३३), शौर्य देवकर (८) आणि विमल भगत (५४) अशी बेपत्ता झालेल्या तिघांची नावे आहेत. ७ सप्टेंबर रोजी हे तिघे कल्याण मोहने येथून घरातून बेपत्ता झाले. विमल भगत ही अनुसयाची आई असून, हे तिघे मागील काही वर्षांपासून कल्याणच्या खडकपाडा येथील मोहने या ठिकाणी राहण्यास आहेत. विमल यांचा पती साहेबराव (६०) हे आपल्या मुलाकडे राहत असून, अनुसया ही पतीपासून विभक्त राहते. विमल आणि अनुसया या दोघी मायलेकींचे वागणे मागील काही महिन्यांपासून विचित्र होते. दोघींचा स्वभाव एकलकोंडा झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.

(हेही वाचाः धक्कादायक! खंडणीसाठी महिला बनली नक्षलवादी!)

बुवाबाजीने केला घात?

बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विमल यांचा मृतदेह मोहने येथील तलावात सापडला. मात्र, नातेवाईक तसेच शौर्यचे वडील राहुल देवकर यांनी सर्वत्र शोध घेऊनही अनुसया आणि ८ वर्षाचा शौर्य यांचा मात्र अद्याप काहीच थांगपत्ता लागलेला नाही. खडकपाडा पोलिस ठाण्यात याबाबत साहेबराव भगत यांनी तक्रार दाखल केली आहे.  दरम्यान नातेवाईकांनी घरात काही पुरावा मिळतोय का ते तपासले असता, शौर्यचे वडील राहुल यांना शौर्यच्या शाळेच्या वहीत देवदेवस्कीचा प्रकार आढळून आला. या वहीत चित्र काढून वेगळ्या भाषेत मंत्रोच्चार पेन्सिलने लिहलेले होते. दोघी मायलेकी बुवाबाजीच्या आहारी गेल्या होत्या, अशी माहिती राहुल देवकर यांनी दिली आहे. पत्नी आणि मुलांसोबत काही वाईट घटना तर घडली नसावी, असा संशय देवकर यांनी व्यक्त केला आहे. या वहीच्या पानातील मजकुराचा नेमका अर्थ काय, याचा तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज

सहाय्यक उपनिरीक्षक आंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत असून महिलेच्या मोबाईल फोनची माहिती मिळवण्यात आली आहे. ती मागील काही महिन्यांपासून मोबाईलवर कुणाच्याही संपर्कात नव्हती. तसेच एक सीसीटीव्ही फुटेज आमच्या हाती आले असून, हे तिघे घरातून बाहेर पडून तलावाच्या दिशेने जाताना त्यात दिसून येत आहे, अशी माहिती आंधळे यांनी दिली.

(हेही वाचाः राज्यात महिला सुरक्षित? गेल्या काही दिवसांत घडल्या ‘इतक्या’ बलात्काराच्या घटना)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here