प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. यादरम्यान, गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलांनी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी सायंकाळी ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या माध्यमातून चेंबूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. सोनू निगमचा चेंबूर फिस्टिवलमध्ये लाईव्ह कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर सोनू निगम स्टेजवरुन खाली उतरताना सोनूसोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी धावपळ केली. त्याचवेळी आमदाराचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने सोनू निगमसोबत धक्काबु्क्की केल्याची माहिती समोर येत आहे.
या धक्काबुक्कीमध्ये सोनू निगम स्टेजच्या पायरीवरुन खाली पडला, त्याला वाचवायला गेलेल्या सोनू निगमच्या अंगरक्षकांमधील दोन जणसुद्धा खाली पडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारात सोनू निगम सुदैवाने वाचला असून त्याच्यासोबत टीममध्ये असलेली एक व्यक्ती जखमी झाली आहे. दरम्यान, सोनूला सोमवारी रात्री जवळच्या जैन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर डाॅक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे. सोनू निगम सध्या सुखरुप आहे.
( हेही वाचा: तुर्कीये मध्ये पुन्हा भूकंप; 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप, काही इमारती कोसळल्या )
मध्यरात्री सोनू निगमकडून पोलिसांत तक्रार दाखल
समोर आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सोनू निगमने चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम 341,323,337 च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नित फातर्फेकर याने सोनू निगमसोत का धक्काबुक्की केली? या धक्काबुक्कीच्या मागचा उद्देश काय आहे? या संदर्भात अधिक तपास चेंबूर पोलीस करत आहेत.
Join Our WhatsApp Community