राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून पेपर फुटीचे पेव फुटले आहे. वेगवेगळ्या परिक्षांचे पेपर फुटतात तसा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्पही फुटल्याने गोपनीयतेचा भंग झाला आहे. पालिकेचे अधिकारीच चापलूसगीरी करीत असल्याने असे गंभीर प्रकार घडत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. तेव्हा, संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.
अर्थसंकल्पाच्या फूटीवरून प्रशासनावर टीकेची झोड
ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प सादरीकरणाची स्थायी समितीची विशेष सभा ठाणे महापालिका भवनातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात वेबिनारद्वारे आयोजित करण्यात आली होती. या वेबिनार बैठकीतील अर्थसंकल्पाचे विवेचन काही दैनिकांसह सर्वत्र आधीच जाहीर झाल्याने अर्थसंकल्प फुटल्याचे उघड झाले. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाकडून अर्थसंकल्पाबाबतची गोपनीयता राखली न गेल्याचे दिसून आल्याने यावरून ठाण्यात गदारोळ उठला. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही अर्थसंकल्पाच्या फूटीवरून प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.
(हेही वाचा – लैंगिक अत्याचार करणारा पिता निघाला एचआयव्हीग्रस्त…)
…अन्यथा मनसे आंदोलन छेडणार
राज्यात आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून दररोज काही न काही फुटत आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा, म्हाडा परीक्षेचे पेपर फुटले. आता तर ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्पही फुटला, काही अधिकाऱ्याकडून हा अर्थसंकल्प फोडण्यात आला. काही अधिकाऱ्यांना आपली खुर्ची टिकावी, एखादे पद मिळावे यासाठी संगनमताने असले उद्योग सुरू आहेत. अशा प्रकारे अर्थसंकल्प फोडून काही अधिकारी चापलूसी करत असून पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी याची तात्काळ गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा मनसे आंदोलन छेडणार असा इशारा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.
Join Our WhatsApp Community