माहिम मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार आणि राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि त्यांची पत्नी मिताली ठाकरे यांनी दादर, मुंबई येथील सावरकर सदनाला सदिच्छा भेट दिली. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी तेथील वस्तूंचे अवलोकन केले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्नुषा सुंदर सावरकर यांची भेट घेऊन अमित ठाकरे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नात असीलता सावरकर राजे याही उपस्थित होत्या.
(हेही वाचा – त्यांचा पक्ष आता ओवैसींच्या दावणीला बांधला आहे; Sanjay Shirsat यांची उद्धव ठाकरेंवर टीका)
अमित ठाकरे सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. माहिम विधानसभा मतदारसंघात (Mahim Vidhansabha 2024) अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे सदा सरवणकर, उबाठा गटाचे महेश सावंत हे उभे आहेत.
सावरकर सदनाचा काय आहे इतिहास ?
दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क परिसरात डॉ. मधुकर बी. राऊत मार्गावर बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या बाजूला पांढऱ्या रंगाची इमारत दिसते. ही वास्तू म्हणजेच लाखो देशभक्तांची प्रेरणा असलेले सावरकर सदन (Savarkar Sadan) होय. स्वातंत्र्यवीर सावरकरांची 10 मे 1937 रोजी रत्नागिरीतील स्थानबद्धतेतून सुटका झाली. त्यानंतर ते दादरच्या गणेश पेठ लेन येथील सावरकर भुवन या स्वत:च्या घरात सर्व कुटुंबासोबत राहिले. त्यानंतर त्यांनी ही इमारत विकून शिवाजी पार्क वसाहतीमधील प्लॉट नंबर 71 वरील जागेवर इमारतीचे बांधकाम सुरू केले. जून 1938 मध्ये ‘सावरकर सदन’ या वास्तूत स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांच्या पत्नी यमुनाबाई (माई), कन्या प्रभात, पुत्र विश्वास, मोठे बंधू बाबाराव, धाकटे बंधू डॉ. नारायणराव, त्यांच्या पत्नी शांताबाई आणि त्यांची मुले राहावयास आले. याच ठिकाणी सावरकरांचं शेवटपर्यंत वास्तव्य होते. याच घरातून त्यांनी हिंदू महासभेच्या व्यासपिठावरून आपल्या ध्येयाच्या प्रचारार्थ हिंदुस्थानभर दौरे काढून प्रचार केला. भारत स्वतंत्र झाला, त्या दिवशी सावरकरांनी तिरंगा ध्वज आणि कुंडली कृपाणांकित भगवा ध्वज इमारतीच्या गच्चीवर फडकवला. 1948 साली गांधीजींच्या हत्येनंतर सावरकर सदनावर हल्ला झाला होता. 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांचे निधन झाले. त्या वेळी याच इमारतीमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लाखो नागरिकांनी सावरकरांचे अंत्यदर्शन घेण्यास त्या वेळी गर्दी केली होती.
या इमारतीत सध्या सावरकर कुटुंबातील त्यांची सून सुंदरताई सावरकर या राहत आहेत. येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना मिळालेली मानपत्रे, त्यांच्या वापरातील वस्तू, त्यांची पुस्तके, जुने फोटो अशा महत्त्वाच्या वस्तू आहेत. सुमारे 28 वर्षे सावरकरांचे या इमारतीत वास्तव्य होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community