तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसेकडून जंगी तयारी, कसं आहे आयोजन?

125

दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यंदाही राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जंगी साजरी केली जाणार आहे. आज सोमवारी सकाळी ६.३० वाजता महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, ता.जुन्नर, पुणे येथे मनसे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे अभिषेक व पूजन करणार आहेत. सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, नेते अमितजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केले असल्याचे सांगितले जात आहे.

मनसेतर्फे साजरी होणाऱ्या शिवजयंतीची होतेय चर्चा 

मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक अमेय खोपकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शिवजयंतीच्या निमित्ताने ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ, दादर परीसरात होणार आहे. तर आज होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यास तमाम शिवभक्त, पक्षाचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक हे मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आज मुंबईमध्ये मनसेतर्फे साजरी होणाऱ्या या शिवजयंतीची सध्या चांगलीच चर्चा असून आज मनसेचं शक्तिप्रदर्शन देखील बघायला मिळणार आहे.

मनसेकडून शिवजयंतीचं असं आहे आयोजन

  •  प्रत्येक विभागात शिवजयंती साजरी होणार
  • दादरमध्ये महिलांची रॅली निघणार
  • मुंबईभरातले मनसैनिक शिवतीर्थावर एकवटणार
  • राज ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर उपस्थित राहणार
  • विभागवार शिवजयंतीची रथयात्रा निघणार आहेत

मनसैनिकांच्या बाईक रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली

आज साजरी होणाऱ्या शिवजयंतीवरून मनसे आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने आले आहेत. एकीकडे MIM च्या महाविकास आघाडीत येण्याच्या प्रस्तावावरुन भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला तर दुसरीकडे शिवजयंतीसाठी रॅलीला परवानगी न दिल्याने राज्यात शिवसेनेचं सरकार आहे की MIM चं? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे . राज ठाकरेंच्या आवाहनानंतर शिवजयंतीसाठी मनसैनिकांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कवर जंगी तयारी केली. परंतु मनसेकडून काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मनसे नेत्यांनी मविआ सरकारवर चांगलेच टिकास्त्र सोडले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.