शिवसेनेपाठोपाठ मनसेही देणार दुकानांच्या मराठी पाट्या मोफत

116

मुंबईतील दुकानांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात, अशा प्रकारचा राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेतल्यानंतर अनेक दुकानदारांनी याबाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. कोविड काळामध्ये आधीच अर्थव्यवस्था कोलमडून पडलेली असतानाच त्यातच या मराठीतील पाट्याचा भार दुकानदारांवर का असाही सवाल केला होता. त्यामुळे ज्या दुकादारांना मराठीतून पाट्या बनवणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, त्यांना मोफतमध्ये मराठी पाट्या बनवून देण्याचे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आल्यानंतर आता मनसेनही दुकानदारांना आवाहन केले आहे. परंतु आवाहन करून आठ दिवस उलटले तरी मनसेकडे एकही दुकानदार पुढे आला नाही. त्यामुळे दुकानांवरील मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेसोबतच मनसेही तेवढ्या ताकदीने प्रयत्न करताना दिसत आहे.

( हेही वाचा : प्रवाशांनो, लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक! )

‘आवाहनही आणि मदतही’

मुंबईतील दुकानांच्या नावाचे फलक हे मराठी भाषेतून लावण्यात यावेत अशाप्रकारच अधिनियमांमध्ये तरतूद असली तरी त्यामध्ये सुधारणा करून सुधारीत नियम बनवण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील अनेक दुकानांच्या पाट्यांवर मराठी भाषेतील नाव हे एका कोपऱ्यात आणि छोट्या आकारात लिहिले जात होते ते आता ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहावे लागणार आहे. परंतु सरकारच्या निर्णयानंतर अनेक दुकानदारांच्या संघटनांनी आर्थिकदृष्ट्या परडवणारे नाही आणि कोविड काळानंतर आता कुठे तरी दुकानदार सावरले जात असताना हा भार का टाकला जात आहे, असाही सवाल केला होता.

त्यानंतर दहिसरमधील शिवसेना नगरसेविका शितल म्हात्रे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दुकानदारांना आवाहन करत ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा. त्या दुकानदारांना शिवसेनेच्या माध्यमातून मराठीतील फलक बनवून दिले जातील,असे त्यांनी म्हटले होते. म्हात्रे यांनी २० जानेवारी रोजी आवाहन केल्यानंतर, मागील सोमवारपासून मनसेचे माहिम विधानसभेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी प्रत्येक चौकांमध्ये ‘आवाहनही आणि मदतही’ असे फलक लावले आहे.

( हेही वाचा : दवा बाजारसह गिरगावमधील ९२ फेरीवाल्यांना हटवले! )

मोफत नामफलक

या फलकांवर माहिम विधानसभेतील कोरोनामुळे ज्या व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली असेल तर त्या व्यापाऱ्यांना मनसेच्यावतीने मोफत मराठी नामफलक दिले जातील, असे आवाहन केले आहे.

शिवसेनेपाठोपाठ मनसेनही आता मराठीतील नामफलक मोफत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही माहिम विधानसभा क्षेत्रात तब्बल ६०ठिकाणी फलक लावून हे आवाहन केले आहे. मागील सोमवारपासून हे फलक लावले आहेत. परंतु चौकाचौकांमध्ये हे फलक लावल्यानंतर एकाही दुकानदारांने अद्याप मनसेच्या शाखेशी संपर्क साधला नाही. त्यामुळे दुकानदारांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ हवेत बाता ठोकू नये. मराठी पाट्या लावायला कुठल्याही दुकानदाराला आर्थिकदृष्टया शक्य नाही, असे यावरून दिसून येते. तरीही आम्ही दुकानदारांना पुन्हा एकदा आवाहन करू की जर आपल्याला मराठीतून नामफलक लावण्याचा खर्च पेलत नसेल तर त्यांनी खुशाल आमच्या शाखेशी संपर्क साधावा. मनसेच्या माध्यमातून आपल्याला एकही पैसा खर्च करून न देता मोफत नामफलक उपलब्ध करून दिला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.