कोरोना निर्बंधांमुळे रेल्वे प्रवास करण्यावर मर्यादा होत्या परंतु आता सर्व सेवा पूर्ववत झाल्या असून रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाईल चोरांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकल प्रवासादरम्यान मोबाईल चोरी होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. २०२१ पासून १० हजार १५९ प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले असून यापैकी २ हजार ६१८ मोबाईल परराज्यातून हस्तगत करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.
( हेही वाचा : ‘भारत जोडो’मध्ये सहभागी व्हा, त्याबदल्यात दसरा मेळाव्यात सहकार्य करू; काँग्रेसचा ‘उद्धवसेने’ला प्रस्ताव)
मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल सुद्धा चोरीला जात आहेत. जानेवारी २०२१ पासून ते ऑगस्ट २०२२ पर्यंत १० हजार १५९ मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. हे मोबाईल प्रामुख्याने परराज्यांमध्ये विकले जात आहेत. चोरीला गेलेले मोबाईल महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, दिल्ली, हरियाणा इत्यादी अन्य राज्यांमधून हस्तगत करण्यात आले आहेत.
मुंबई लोहमार्ग हद्दीत मोबाईल चोरीचे गुन्हे
मध्य रेल्वे
- २०२१- दाखल गुन्हे २ हजार ६७४
- २०२२ – दाखल गुन्हे ४ हजार ३९
पश्चिम रेल्वे
- २०२१ – दाखल गुन्हे १ हजार ३९५
- २०२२ – दाखल गुन्हे २ हजार ५१