मोबाईल रिपेअरिंगला देताय? मग सावधान… तुमच्यासोबतही होऊ शकते ‘असे’

बिघडलेला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार असतो. पण हाच उतावीळपणा आपल्या अंगाशी येऊ शकतो.

शरीरातील इतर अवयवांचा आपण जितका वापर करत नसू, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वापर आपण आजकाल मोबाईलचा करतो. एकवेळ एका किडणीवर माणूस जगू शकेल, पण मोबाईल नसेल तर त्याला मेल्याहून मेल्यासारखे होईल. त्यामुळे असा हा आपला प्राणप्रिय मोबाईल बंद पडल्यानंतर आपण अस्वस्थ होतो. तो लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी आपण वाट्टेल ते करायला तयार असतो. पण हाच उतावीळपणा आपल्या अंगाशी येऊ शकतो. याचा अनुभव मुंबईतील एका डॉक्टर महिलेला आहे.

मुंबईतील एका महिला डॉक्टरच्या मोबाईल मधील खाजगी व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलवर फॉरवर्ड करुन, एका मोबाईल रिपेअरिंग कारागिराने या महिला डॉक्टरकडे चक्क ३ लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी नालासोपारा येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

(हेही वाचाः फेसबूक अकाऊंट हॅक झाल्यावर काय कराल? ‘या’ स्टेप्स करा फॉलो)

काय झाले नेमके?

तारिक रहेमान(२७) असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्या कारागिराचे नाव आहे. ग्रँट रोड येथील एका नामांकित मोबाईल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये तारिक हा ६ महिन्यांपूर्वी मोबाईल रिपेअरिंगचे काम करत होता. फोर्ट येथील एका रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये राहणा-या महिला डॉक्टरने तिचा मोबाईल फोन रिपेअरिंगसाठी ग्रँट रोड येथील या सर्व्हिस सेंटर मध्ये दिला होता. मोबाईल रिपेअरिंगला देण्यापूर्वी तिने मोबाईल मधील खाजगी डेटा तसाच ठेवला. त्यात खाजगी व्हिडिओ, फोटो होते व पतीसोबत ठेवलेल्या संबंधाचे व्हिडिओ देखील मोबाईल फोनमध्ये होते.

खंडणीची केली मागणी

मोबाईल रिपेअरिंग झाल्यानंतर ती मोबाईल परत घेऊन आली. त्यानंतर तब्बल ६ महिन्यांनी तिला एका अनोळखी मोबाईल नंबरवरुन फोन आला व फोन करणाऱ्याने तिला पतीसोबत असलेल्या संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली व ३ लाख रुपयांची खंडणी मागितली. या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने ताबडतोब एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

(हेही वाचाः ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीला सोनसाखळी चोरांचा फटका)

असा घेतला डेटा

पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. पोलीिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी ताबडतोब या गुन्ह्याचा तपास करुन आलेल्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला. त्यानंतर आरोपी तारिकला नालासोपारा येथून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या डॉक्टर महिलेने मोबाईल रिपेअरिंगला दिल्यानंतर मोबाईलमधले व्हिडिओ त्याने स्वतःच्या मोबाईलवर फॉरवर्ड करुन घेतले होते. तसेच त्या महिलेचा मोबाईल क्रमांक देखील स्वतःच्या मोबाईल मध्ये सेव्ह करुन ठेवल्याची त्याने कबपुली दिली आहे.

त्याला ईद साजरी करायची होती 

बकरी ईद जवळ आली होती. कामधंदा व्यवस्थित नसल्यामुळे सण कसा साजरा करायचा, या विचारात असताना तारिक रहेमान याला डॉक्टर महिलेकडून पैसे उकळण्याची कल्पना सुचली. या पैशांतून तो कुटुंबासह बकरी ईद साजरी करणार होता. मात्र पोलिसांनी ईदच्या आदल्या दिवशीच तारिकला अटक केली.

(हेही वाचाः फेसबूकवरील मित्राच्या ‘फेक’ बोलण्याला महिला पोलिस अधिकारी भुलली! आणि मग…)

नागरिकांना आवाहन

मोबाईल रिपेअरिंगला देण्यापूर्वी नागरिकांनी आपला सर्व डेटा काढून मगच तो रिपेअरिंगला द्यावा किंवा स्वतःच्या डोळ्यांदेखत मोबाईल फोन रिपेअरिंग करुन घ्यावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी नागरिकांना केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here