कोरोनाकाळात हातावर पोट असणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने रेशन लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. पुढे सप्टेंबर २०२२ पर्यंत या योजनेची मुदत वाढविण्यात आली. मात्र सप्टेंबर सरत आला, तरी लाभार्थ्यांपर्यंत चालू महिन्याचे मोफत धान्य पोहोचलेले नाही. त्यामुळे सप्टेंबरच्या मोफत रेशनवर कोणी डल्ला मारला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
(हेही वाचा – नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट)
अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रेशन लाभार्थ्यांना विकत मिळणाऱ्या धान्यासोबत प्रतिव्यक्ती ५ किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा निर्णय मोदी सरकारने कोरोनाकाळात घेतला. त्यामुळे या संकटकाळात गरजूंना मोठा आधार मिळाला. पुढे या योजनेची मुदत सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली. रेशनकार्ड धारकांना ऑगस्ट २०२२ पर्यंत विकत धान्याच्या जोडीला मोफत धान्य मिळाले. परंतु, सप्टेंबर महिन्याचे धान्य देताना चालढकल सुरू आहे.
मुंबईसह बुलढाणा आणि नांदेड जिल्ह्यात हे प्रकार सर्वाधिक सुरू आहेत. मुंबई उपनगरात बहुतांश लाभार्थ्यांना विकतचे धान्य मिळाले, पण सप्टेंबर महिना संपत आला तरी मोफत धान्य मिळालेले नाही. काही ठिकाणी धान्यसाठा पोहचूनही मोफत रेशन दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत विचारणा केली असता, दुकानदार उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
दुकानदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा!
मोफत धान्य योजनेची मुदत सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. सप्टेंबर महिना संपला की तांत्रिकदृष्ट्या दुकानदार मोफत धान्य देण्यास जबाबदार राहणार नाहीत. त्यामुळे मुद्दामहून चालढकल करून सप्टेंबर संपण्याची वाट पहिली जात आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने याची गंभीर दखल घेऊन, संबंधित दुकानदार आणि त्याला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिधापत्रिका अभ्यासक शैलेश सोनावणे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना केली.
भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) गोदामांमधून धान्य पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे काही जिल्ह्यांत मोफत रेशन वितरण झालेले नाही. मुंबईचा विचार करता बोरिवलीतील गोदमातून ३० सप्टेंबरला पुरवठा केला जाईल, असे कळविण्यात आले आहे. एकही लाभार्थी या लाभापासून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. – विजय वाघमारे, सचिव, अन्न-नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग
मुंबईतील रेशनकार्ड धारक
• बीपीएल – २३,७१३
• अंत्योदय – २०,६१४
• केशरी – ३२,५३,२१४