मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये कॉलेज तरुणीवर अतिप्रसंग; महिला रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

119

कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनसाठी निघालेल्या २० वर्षीय तरुणीवर धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका कचरा वेचक व्यक्तीने हल्ला करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी चर्निरोड ते चर्चगेट स्थानकाच्या दरम्यान घडली. हल्लेखोराला प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले असून चर्चगेट रेल्वे पोलिसांनी या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या या घटनेनंतर महिला प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ इलेक्ट्रिक बसच्या निविदेचा वाद; टाटा मोटर्सच्या याचिकेवरील निकाल राखीव)

महिला प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

वरळी येथे राहणारी २० वर्षांची कॉलेज तरुणी मंगळवारी सायंकाळी कॉलेज अ‍ॅडमिशनसाठी चर्चगेटला जाण्यास निघाली होती. सायंकाळी ५:३०वाजण्याच्या सुमारास प्रभादेवी रेल्वे स्थानकातून तिने चर्चगेटकडे जाणारी ट्रेन पकडली. ही तरुणी बसलेल्या महिला डब्यात एक महिला आपल्या दोन मुलांसह बसली होती, व दारात एक मळलेले कपडे, दाढी वाढलेला इसम उभा होता. पीडित तरुणी सीटवर येऊन बसलेली असता मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक जाताच दारात उभा असलेला इसम या तरुणीच्या समोर येऊन बसला.

महिला डब्यात पीडित तरुणी आणि एकच महिला आपल्या दोन लहान मुलांसह असल्यामुळे त्या दोघी घाबरल्या.  चर्नीरोड ते चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये हा इसम पीडित तरुणीची बॅग खेचू लागला असता पीडितेने त्याला विरोध केला असता त्याने तिच्यावर हल्ला करून तिला डब्यातच खाली पाडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिच्या ओठांना चावा घेतला. हा प्रकार बघून घाबरलेल्या दुसऱ्या प्रवासी महिलेने आरडाओरड करून धोक्याची साखळी ओढली.

उपचारासाठी रुग्णालयात दाखल

ट्रेन स्लो होताच या व्यक्तीने ट्रेनमधून उडी टाकून पळ काढला असता दुसऱ्या डब्यातील पुरुष प्रवाशांनी उडी टाकून धावत जाऊन त्याला पकडले. त्याचवेळी चर्चगेट पोलीस देखील त्या ठिकाणी पोहचले आणि या व्यक्तीला ताब्यात घेऊन जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी चर्चगेट पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीविरुद्ध जबरी चोरी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली. अटक करण्यात आलेला इसम स्वतःचे नाव पप्पू गुप्ता तर कधी पप्पू यादव (३५) असे सांगत असून तो गोरेगाव येथे राहणारा असून कचरा वेचण्याचे काम करतो अशी माहिती तायडे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.