पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सध्याचा लूक हा खूपच हटके आहे. गेल्या मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर प्रत्येक वेळी देशातील नागरिकांना आधार देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ते वेळोवेळी जनतेशी संवाद साधत असत. त्यावेळी वाढत्या लॉकडाऊन सोबतच त्यांची दाढीसुद्धा वाढत असल्याचे आपण पाहिले. त्यांच्या लूकमध्ये आलेला चेंज काहींना आवडला, तर काहींनी त्यावर टीका केली. आता राजकारण्यांनी त्यांच्यावर टीका करणं, एवढ्यापर्यंत हे सगळं ठीक होतं. पण आता चक्क एका चहावाल्याने त्यांच्या या लूक वरुन टीका करणं, हे खूप वेगळं वाटतं ना भाऊ…
पण हे खरं आहे. बारामतीतील एका चहावाल्याला मोदींचा हा लूक काही आवडला नाही. त्यामुळे त्याने मोदींच्या या लूकवर टीका केली आहे. इतकंच नाही तर त्याने मोदींना दाढी आणि कटिंग करण्यासाठी चक्क मनीऑर्डर केली आहे.
म्हणून केली मनीऑर्डर
डोक्याचे केस आणि दाढी वाढवत साधूची वेशभूषा करुन देशाच्या समस्या सुटणार नाहीत. वाढवायचेच असेल तर लसीकरण वाढवा, आरोग्याच्या सोयी वाढवा, मागील दीड वर्षांपासून टाळेबंदीच्या नावाखाली रोजगार बुडाल्यांना रोजगार द्या. अशा आशयाचे पत्र लिहून बारामतीतील एका चहावाल्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाढी व कटिंग करण्यासाठी १०० रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे.
दाढी वाढवत साधूची वेशभूषा करुन देशाच्या समस्या सुटणार नाहीत. वाढवायचेच असेल तर लसीकरण वाढवा, असे पत्र लिहून बारामतीतील एका चहावाल्याने चक्क पंतप्रधान मोदींना दाढी करण्यासाठी केली १०० रुपयांची मनीऑर्डर #NarendraModi #Baramati pic.twitter.com/yuU6DYsKDq
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) June 9, 2021
टाळेबंदीमुळे होते उपासमार
अनिल संभाजी मोरे असे या चहा विक्रेत्याचे नाव आहे. बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकासमोर रस्त्याच्या कडेला मोरे अनेक वर्षांपासून एका छोट्याशा स्टॉलवरुन चहाची विक्री करतात. या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र वारंवार होत असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक दिवस चहाचा स्टॉल बंद असल्यामुळे, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. देशातील अनेक नागरिकांची उपासमार होत आहे. टाळेबंदीमुळे नागरिकांना मूलभूत गरजा भागवणे मुश्कील बनले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मी माझ्या व्यवसायातून कष्टाने कमावलेले शंभर रुपये पंतप्रधान मोदी यांना मनीऑर्डर केले आहेत, असे मोरे यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community