मुक्या प्राण्यांवर भूतदया म्हणून मंदिर परिसरात शिजवलेले अन्नपदार्थ देणे आता धोक्याचे ठरु लागले आहे. जंगलानजीकची मंदिरे, पर्यटन स्थळे या परिसरांत माकडांचा वाढता वावर भविष्यात प्राण्यांकडून माणसांवर हल्ले होण्याचे संकेत असल्याची भीती वन्यजीव अभ्यासक व्यक्त करत आहेत.
नाशिकची मंदिरे, पर्यटन स्थळे, औरंगाबाद येथील अजिंठा वेरुळ लेणी, नागपूर येथील रामटेक परिसर या भागांत गेल्या काही वर्षांत माकड आणि वानरांचा जवळपास कायमस्वरुपी मुक्काम झाला आहे. या भागांत माकडांना खायला घालायला देणारी फळे, शेंगदाणे, चणे विकणारे विक्रेतेही वाढले आहेत. माकडांचा समूह कित्येकदा जवळ येत हातातील अन्नपदार्थ हिसकावून घेऊन जातो. विरोध केल्यास कित्येकदा माकडे हिंस्त्र होत असल्याच्या तक्रारीही वनविभागाकडे येत आहेत.
नाशिकमध्ये दर दोन दिवसाला माकड घरात घुसल्याची किंवा माकडांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार वनविभागाकडे येते. नाशकातील सप्तश्रृंगी, पांडवलेणी, त्र्यंबकेश्वर, अंजलेरी परिसरात माकडांचा वावर मोठ्या संख्येने वाढला आहे. लॉकडाऊन काळात ही माकडे मानवाकडून मिळणारे अन्नपदार्थ मिळवण्यासाठी जंगलात परतण्याऐवजी शहराकडे वळली. आजही आम्हांला शहरांत सामाजिक संस्थांच्या मदतीने माकडांना खाऊ घालू नका, म्हणून जनजागृती मोहिम हाती घ्यावी लागते, असे नाशिक वनविभाग (प्रादेशिक) चे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वन्यप्राणी बचाव पथक प्रमुख विवेक भदाणे यांनी सांगितले.
(हेही वाचा – मुंबई किना-यालगत फिरणा-या डॉल्फिनचे रहस्य उलगडणार)
ही केवळ अंधश्रध्दा, वनाधिकाऱ्यांनी केले आवाहन
माकड पकडायला मुळात संबंधित ठिकाणी पोहोचेपर्यंत कित्येकदा माकड झाडावर उड्या मारुन पळूनही जाते. माकड जमिनीवर नसेल तर बेशुद्ध करुन पकडणे जिकरीचे ठरते. बेशुद्द करण्याचे इंजेक्शन बंदुकीच्या माध्यमातून दिल्यास तो जमिनीवर आदळून मरण्याची शक्यता असते. माकडांना खाऊ घालणे म्हणजे प्रत्यक्षात हनुमानााला खाऊ घालणे ही केवळ अंधश्रध्दा असल्याचे वनाधिकारी सांगतात.
…तर भविष्यात माकडांकडून हल्ले वाढणार
माकडांना जंगलातील कच्ची फळे हेच प्रमुख अन्न आहे. त्यांना शिजवलेले अन्न खाऊ घातल्यास त्यांच्या पचन प्रक्रियेवरही भयानक परिणाम होतो. काही ठिकाणी माकड हिंस्त्र होत माणसांचा चावा घेत असल्याच्या तक्रारीही येत आहेत. माकडांकडून माणसाला होणारा त्रास हा केवळ माणसाने वन्यप्राण्याला चुकीची सवय लावल्याने होत आहे. ही सवय नियंत्रणात आली नाही तर भविष्यात शहरांत माकडांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढेल, अशी भीतीही वन्यजीव अभ्यायकांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community