ठाण्यात वानराचा माणसांना चावा, वनाधिकाऱ्यांनी केले जेरबंद

136

ठाण्यातील घोडबंदर येथील ससूनवघर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून माणसांवर हल्ला करणा-या वानराला बुधवारी सकाळी वनाधिका-यांनी बेशुद्ध करुन पकडले. या वानराने आतापर्यंत जवळपास चार जणांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात माणसांना गंभीर जखमा झाल्याने वनविभागाने वानराला जेरबंद करुन त्याची रवानगी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केली.

( हेही वाचा : एसी डबे ट्रेनच्या मध्यभागीच का असतात? ‘हे’ आहे कारण… )

जेरबंद करण्याचा निर्णय

हा वानर लहान मुलांनाही चावत होता. हॉटेलमध्ये घुसूनही त्याने लोकांवर हल्ला केला होता. एका माणसाच्या गालावर घेतलेल्या चाव्यात त्याचे मांसही काही प्रमाणात निघाले. तीन दिवसांपूर्वी वानराने एका महिलेवर हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाने त्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला. गावक-यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका बैठ्या घराच्या गच्चीवरुनच वानराला पकडण्याची मोहिम ठरली. सकाळी साडेनऊ वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वन्यप्राणी बचाव पथकाची टीम पोहोचली. त्यांनी काही मिनिटांतच वानराला बेशुद्ध करुन पकडले. पशुवैद्यकीय डॉक्टर किशोर बाटवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अंदाजे सात वर्षांचा नर वानर आहे. या वानराच्या काही शारिरीक तपासण्या केल्या जातील, नंतरच त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. तोपर्यंत वानर उद्यानातील वैद्यकीय दवाखान्यात राहील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.