जगभरात मंकीपॉक्समुळे जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याची घंटा दिलेली असताना मुंबईतही 2 मंकीपॉक्सचे संशयित रुग्ण सापडल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. या दोघांचाही तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने पालिका आरोग्य विभागाचा जीव भांड्यात पडला. राज्यात 10 संशयित रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने गुरुवारी दिली.
(हेही वाचा – Voter ID: आता 17 व्या वर्षी बनवता येणार मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाचा निर्णय)
दोघांनाही पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाच्या तपासणी अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य संस्था आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाने दिला. एका रुग्णाला कांजण्या तर एकाला चेहऱ्यावर आणि हातावर चट्टे उमटले होते. दोन्ही संशयित पुरुष रुग्णांना खासगी रुग्णालयातून संशयित मंकीपॉक्स रुग्ण म्हणून पालिका आरोग्य विभागाकडे पाठवले होते. पालिका आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्तुरबा रुग्णालयात मंकीपॉक्ससाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे.
संशयित रुग्णांना हीन वागणूक
राज्यातील दहा संशयित रुग्णांबाबात माहिती देताना साथरोग अधिकारी डॉ प्रदीप आवटे म्हणाले की आठ रुग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. दोन रुग्णांचा अहवाल प्रलंबित आहे. या सर्व चाचण्या पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने केल्या. रुग्णांना आणि नातेवाईकांना समाजातील इतरांकडून त्रास होत असल्याने तपशील देण्यास राज्य आरोग्य विभागाने नकार दिला.
विमानतळावर खबरदारी
आफ्रिका येथे मंकीपॉक्सच्या केसेस प्रामुख्याने आढळून येत आहेत. या आजाराचा प्रसार आता युके, युएसए आणि युरोपियन देशांतही झाला आहे. या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तसेच रुग्णांच्या निकटवर्तीयांची तपासणी केली जाईल.
मंकीपॉक्सची लक्षणे
-ताप येणे
– अशक्तपणा
– स्नायू दुखणे
– तोंडाला, हाता-पायाला पुरळ येणे
– डोके दुखणे
– खोकला येणे
– कानामागे, गळ्याभोवती, काखेत, जाघेत ग्रंथी सुजणे