माकडांचा असाही उच्छाद

104

माकडाच्या वाढत्या मनुष्य वस्तीतील मुक्कामाचे उलट पदसाद आता नाशिकमधील त्र्यंबकेश्वर भागात दिसू लागले आहे. कधी नव्हे ते यंदा उन्हाळ्यात माकडांनी थेट माणसांच्या घरी जात त्यांच्या पाण्याची टाकी रिकामी करण्याचा सपाटा लावला आहे. माकडांच्या या त्रासाला कंटाळून स्थानिकांनी सर्व माकडे पकडून जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

टोळीने फिरणाऱ्या माकडांचा खोडकरपणा

यंदाच्या उन्हाळ्यात मनुष्य वस्तीजवळ टोळीने फिरणाऱ्या माकडांच्या स्वभावात हा खोडकरपणा दिसून आला. गेले तीन महिने हळूच चोरपावलाने घरी येत पाण्याच्या टाकीचा नळ सुरु करून माकड घरातून पळून जाते, पाण्याची टाकी संपूर्ण रिकामी होत असल्याने इथला गृहिणीवर्ग या माकडचेषठेला चांगलाच वैतागला आहे. उन्हाळ्यात त्र्यंबकेश्वरच्या डोंगरावरची माकडे मनुष्यवस्तीजवळ येणे इथल्या स्थानिकांना काही नवे नाही. उन्हाळ्यात डोंगरातील पानवठ्यातील पाणी सुकले की माकडांचा ओढा मनुष्यवस्तीजवळ आढळतो. या परिसरातील माणसेही माकडांना अन्नपदार्थ खाऊ घालतात. आयत्या अन्नाच्या सवयीमुळे लोकांच्याजवळ माकडांचा वाढता संपर्क गेल्या 3-4 वर्षात जास्तच वाढल्याची माहिती नाशिक वनविभागातील (प्रादेशिक) चे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली.

(हेही वाचा – आला रे आला… मान्सून राज्यात आला)

भविष्यात माकडांकडून माणसावर हल्ले होण्याची भीती

माकडांची मनुष्य वसाहतीतील वाढती जवळीक पाहता भविष्यात त्यांच्याकडून माणसावर हल्ला होण्याचीही भीती भदाणे यांनी व्यक्त केली. माकडे पाण्याच्या टाकीतील पाणी पीत नाही, त्या पाण्यात आंघोळ करत नाही. केवळ खोडकरपणा म्हणून सुरु असलेल्या या माकडचाळ्यांना आटोक्यात आणण्यासाठी अगोदर माकडांना खाऊ घालू नका, यासाठी वनविभाग इकोएको या प्राणीप्रेमी संस्थेच्या साहाय्याने जनजागृतीवर भर देणार आहे.

मानव – माकड संघर्ष टाळण्यासाठी

0 माकडांना खाऊ घालू नका
0 शिजवलेले अन्नपदार्थ माकडांचे अन्न नाही. आयत्या खाण्याकडे माकड मनुष्यवस्तीजवळ आकर्षित होते. त्यांची जंगलातील पुरेसे नैसर्गिक अन्न खाण्याची सवय अबाधित ठेवणे गरजेचे आहे.
0 माकडांचा वावर असलेल्या ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थ ठेवू नका. गच्चीवर पापड सुकवायला किंवा लोणाच्याची बरणी ठेवू नका

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.