ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरु होत असताना मुंबईत व नजीकच्या भागात अचानक पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावत सरप्राईज दिले. मुंबईच्या तुलनेत महानगर भागाला पावसाने चांगलेच झोडपले. सकाळी दहा ते दुपारी तीन या सलग तीन तासांत डोंबिवली पूर्वेला 110.3 मिमी इतका पाऊस झाला. छत्रीची सवय मोडलेल्या कित्येकांची शुक्रवारी पंचाईत झाली. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारी रायगड, रत्नागिरी तसेच नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झाल्याने राज्याच्या वेशीपर्यंत पोहोचलेल्या पावसाच्या परतीच्या प्रवासाला आता ब्रेक लागणार आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस सक्रिय होत असल्याचे वातावरणीय बदलातून दिसून येत आहे. परंतु उत्तर कोकणात हलक्या पावसाचा पूर्वानुमान असताना शुक्रवारची सकाळ मुंबईकरांसाठी संततधार पावसाची ठरली. संपूर्ण मुंबईत पावसाचा मारा सुरु होता. घाटकोपर, परळ, मुलुंडला पाऊस झाला. ठाणे आणि नवी मुंबई भागात पावसाचा मारा जास्त दिसून आला. कोपरखैराणे येथे 56.1 मिमी, ऐरोली गावात 50.4, ठाण्यात चिरागनगर येथे 65.6 मिमी, ढोकळी येथे 47.1 मिमी, कासारवावडीत 40.5. मिमी पावसाची नोंद झाली. कल्याण पश्चिमेला 84.8 मिमी पाऊस झाला तर विठ्ठलवाडीत 63.7 मिमी पावसाची नोंद झाली. पनवेल येथे 52.82 मिमी पाऊस झाल्याचे दिसून आले.
राज्यभरात मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्याचा प्रभाव गुरुवारपर्यंत दिसून येईल. मुंबईत शनिवारपर्यंत तर पालघर, ठाण्यात आणि रायगड जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ताशी 30/40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हलका पाऊसही होईल. मध्य महाराष्ट्राच्या संपूर्ण पट्ट्यात गुरुवारपर्यंत सारखेच वातावरण राहील. सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्याचा काही भागात अधूनमधून हलका पाऊस आणि वाऱ्यांचा वेग राहील. लातूर, उस्मानाबादमध्ये रविवारी मुसळधार पाऊस होईल. विदर्भात केवळ मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट दिसून येईल.
Join Our WhatsApp Community