गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या पूल दुर्घटना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली न्यायिक आयोग स्थापन करण्यासाठी तातडीने निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आलीय. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आगामी 14 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.
(हेही वाचा – मोरबी पूल दुर्घटनेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी भावूक, बघा व्हिडिओ)
मोरबी येथील पूल दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी गांधीनगरमध्ये अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अपघाताची माहिती घेतली आणि जखमींना पूर्ण मदत करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 नोव्हेंबरला राज्यात राजकीय शोक जाहीर करण्याचा निर्णय घेतला. बचाव आणि मदत कार्यात कोणताही हलगर्जीपणा करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, मच्छू नदीवरील केबल पूल कोसळून लोकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी 9 जणांना अटक केली. इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत भाजप खासदार मोहन कुंडारिया यांच्या 12 नातेवाईकांचा मृत्यू झालाय. दरम्यान, पंतप्रधान मोदी आज म्हणजेच मंगळवारी मोरबीला दाखल झाले आहेत. इथे ते पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याने यापूर्वी होणारा त्यांचा रोड शो मोदींनी रद्द केल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community