भारतीय वेधशाळेने ३१ मे रोजी जून ते सप्टेंबर महिन्यात पावसाच्या अपेक्षित वाटचालीबाबत माहिती दिली आहे. यंदाच्या ऋतूमानात पाऊस १०३ टक्क्यांच्या आसपास चार टक्के अधिक किंवा कमी कोसळेल, असा अंदाज भारतीय वेधशाळेचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा यांनी जाहीर केला. हा पाऊस सरासरीपेक्षा निश्चितच जास्त असणार आहे.
पाऊस सरासरीपेक्षा निश्चितच जास्त
या अगोदरच्या अंदाजपत्रकात जून ते सप्टेंबर महिन्यात ९९ टक्के पावसाचा अंदाज भारतीय वेधशाळेने जाहीर केला होता. मध्य भारतात १०६ टक्के , दक्षिणेत १०६ टक्के तर आग्नेयकडील भूभागांत ९९ ते १०८ टक्क्यांपर्यंत पाऊस राहील. चार महिन्यांच्या ऋतुमानात वरुणराजा राज्यातील मध्य महाराष्ट्रात जास्त बरसेल. हिमालयातील पर्वतरांगा, वायव्य आणि उत्तरेकडील राज्ये, दक्षिण भारतातील आग्नेय भागांत वरुणराजा चारही महिने सक्रिय राहील.
( हेही वाचा : 1 जूनला लालपरी होणार 75 वर्षांची )
जून महिना नैऋत्य मोसमी वारे देशात दाखल होण्याचा काळ असतो. त्यामुळे देशभरात पोहोचताना नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे देशभराच्या तुलनेत आंध्रप्रदेश आणि तेलंगणात जास्त पाऊस पडेल. त्यानंतर दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र, गुजरात राज्यातील नैऋत्य दिशेकडील भूभाग, उत्तर प्रदेश, जम्मू-कश्मीर, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडच्या भागांतही दमदार हजेरी लावतील. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या हिमालय पर्वतरागांमध्ये पावसाचा जोर जास्त असेल. केरळातून देशात प्रवेश करणारा वरुणराजा जून महिन्यात केरळात सर्वसामान्य प्रमाणात पाऊस देईल. नैऋत्य मोसमी वारे देशातील वायव्येकडील भागांत सर्वात उशिरा पोहोचतात. त्यामुळे या भागांतील कमाल तापमानात फारशी घसरण दिसून येणार नाही. मात्र किमान तापमान खाली सरकण्यास सुरुवात होईल. त्यासह आग्नेयकडील राज्यांतही किमान तापमानात घसरण दिसून येईल, असे जून महिन्यातील अपेक्षित अंदाजपत्रकात भारतीय वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community