मुंबई महानगरपालिका शाळांच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु असून यंदा १ लाख नवीन प्रवेश करण्याचे ध्येय शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. त्यासाठी मिशन ऍडमिशनः एकच लक्ष्य – एक लक्ष ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १८ एप्रिल २०२२ पासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून आजमितीस अवघ्या ५ दिवसात तब्बल ११ हजार ५४९ नवीन प्रवेश निश्चित झाले आहेत.
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे ओढा
महानगरपालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ लागली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार आणि सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने यंदा मिशन ऍडमिशनः एकच लक्ष्य – एक लक्ष या मोहीम अंतर्गत किमान १ लाख नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी तसेच शिक्षकवर्ग ही मोहीम राबवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा ८ भाषिक माध्यमांच्या शाळा संचालित केल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळांमध्ये मिळून सद्यस्थितीत ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही विद्यार्थी संख्या गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २९ हजारने वाढली आहे. महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता पाहून आपल्या पाल्यांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे ओढा वाढल्याचे यातून स्पष्ट होते.
( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! १ मे पासून ‘या’ गाड्या धावणार विद्युतवेगाने… )
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये १८ एप्रिल २०२२ पासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रामुख्याने बालवाडी (नर्सरी) ते पहिली, दुसरी वर्गांमधील प्रवेश पालकांकडून सध्या निश्चित केले जात आहेत. जसेजसे विविध शाळांमधील वेगवेगळ्या इयत्तांचे निकाल लागतील, तसेतसे मुंबई पब्लिक स्कूलमधील इतर इयत्तांमधील प्रवेश देखील वाढीस लागतील. पहिल्या पाच दिवसांमध्येच सुमारे ११ हजार ५४९ प्रवेश निश्चित झाले असल्याने १ लाख नवीन प्रवेशाचे लक्ष्य गाठले जाईल, याची प्रशासनाला खात्री आहे. प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ३१ जुलैपर्यंत महानगरपालिका शाळांमधील खात्रीशीर नियमित प्रवेश प्रक्रिया सुरु राहील.
‘मुंबई पब्लिक स्कूल’
महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये एकसूत्रता यावी, सर्व शाळांचा सामाजिक दर्जा एकसमान गुणवत्तापूर्ण रहावा, याकरिता सर्व शाळा आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या नावाने ओळखल्या जात आहेत. या शाळांमधून दिल्या जाणाऱया गुणवत्तापूर्ण शिक्षणातून ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचून देशाचे भावी आधारस्तंभ सुसंस्कृत व्हावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. बालवाडी (नर्सरी) ते दहावीपर्यंत निःशुल्क शिक्षण देणाऱया महानगरपालिका शाळांमध्ये अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. महानगरपालिकेच्या शाळांमधील दहावी (एस.एस.सी.) बोर्ड परीक्षेचा निकाल सन २०१९ च्या ५३.१४ टक्के निकालावरून सन २०२० मध्ये थेट ९३.२५ टक्के व सन २०२१ मध्ये १०० टक्के निकालात परिवर्तित झाला आहे, यावरुन शिक्षण विभागाची झेप लक्षात येते.
पालकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद
महानगरपालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या मोफत व दर्जेदार शिक्षणाच्या निरनिराळ्या सुविधा तसेच राबविण्यात येत असलेले विविधांगी उपक्रम याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी ‘मिशन ऍडमिशन, एकच लक्ष्य – एक लक्ष’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याला पालकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्यांना सर्वोत्कृष्ट असे शिक्षण देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असून तो यशस्वी करण्याचा निर्धार महानगरपालिका प्रशासनाने केला आहे, असे सहआयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community