‘या’ कारणासाठी आईनेच केली तीन महिन्यांच्या मुलीची हत्या

काळाचौकी येथील मुलं चोरीचा गुंता सोडवण्यास पोलिसांना यश आले आहे. फेरबंदर संघर्ष नगर येथून साडे तीन महिन्यांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. दुसरीही मुलगी झाल्याच्या कारणावरून तिने मुलीला पाण्याच्या पिंपात बुडवून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मुलीचा हत्येपासून बचाव करण्यासाठी तिने मुलं चोरीला गेल्याचा बनाव रचून त्याचे खापर भांडीविक्रेत्या महिलांवर फोडण्याचा प्रयत्न केला होता.

मुलगी नकोशी म्हणून केली हत्या

सपना मकदूम (२९) असे मुलीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आईचे नाव आहे. सपनाला पहिली मुलगी होती व दुसरीही मुलगी झाली होती. दुसरी मुलगी साडे तीन महिन्यांची झाली होती. सपनाला ती नकोशी झाली होती, सोमवारी दुपारी सपनाने पती घरी नसताना साडेतीन महिन्यांची वेदा या मुलीला पाण्याच्या पिंपात बुडवून ठार केले आणि मृतदेह पिंपातच बंद करून ठेवला होता. त्यानंतर तिने  भांडेविक्रीसाठी आलेल्या महिलेने मला बेशुद्ध करून मुलीला उचलून घेऊन गेल्याचा बनाव रचला होता.

(हेही वाचा ओमिक्रॉनची दहशत : मुंबईच्या विमानतळावरच नाकाबंदी)

तिला सायंकाळी अटक करण्यात आली

पोलिसांना तिने सांगितलेली माहिती खरी वाटली, त्यात पोलिसांना परिसरातील एका सीसीटीव्हीत काही महिला रस्त्याने जात असून त्यापैकी एका महिलेच्या हातात लहान मूल असल्याचे दिसल्यामुळे पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला होता. मात्र उलटतपासणीमध्ये सपनाचा बनाव उघडकीस आला आणि मीच मुलीची हत्या करून मृतदेह पिंपात लपवल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. पोलिसांनी सपना हिच्या घरातील पिंपातून वेदा या साडे तीन महिऱ्यांच्या चिमुरडीचा मृतदेह कूजलेल्या अवस्थेत ताब्यात घेऊन पूर्वतपासणीसाठी केईएम रूग्नालय येथे पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सपना हिच्या विरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिला सायंकाळी अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here