इथून पुढे मी माझं आयुष्य जगू शकेन असं काहीच उरलं नाही… एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या तरुणाचे अखेरचे शब्द!

मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाही, फक्त मी कमी पडलो, माझ्याकडे वेळ नव्हता...

156

अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेसारख्या मोठ्या दिव्याला सामोरं जाणं हे काही सोपं काम नाही. अनेक जण त्यासाठी आपलं आयुष्य वेचतात. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे एखादं शिखर सर करण्यापेक्षा कमी नाही. पण हे यश प्राप्त करुन सुद्धा जेव्हा नोकरी मिळत नाही, तेव्हा मात्र तरुणांच्या मनावर निराशेचा डोंगर कोसळतो. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील एमपीएससीमार्फत भरली जाणारी अनेक पदे रिक्त आहेत. कोरोनाचे वाढते संकट असल्यामुळे राज्य सरकार सतत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलत आहे. तर काही विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा नोकरी मिळत नसल्याने नैराश्याच्या खोल गर्तेत सापडले आहेत.

असाच काहीसा प्रकार पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणासोबत घडला. एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही दीड वर्षापासून नोकरी मिळत नाही, या तणावातून स्वप्निलने गळफास लावून स्वतःचा आणि आपल्या स्वप्नांचाही अंत केला. त्याच्या या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून, तरुणांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे. स्वप्निलच्या कुटुंबियांनी त्याच्या आत्महत्येसाठी सरकारला जबाबदार धरले आहे.

परीक्षा उत्तीर्ण झाला पण…

आपल्या आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन स्वप्निलने एमपीएससीची तयारी केली. त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांना यश आलं. तो 2019मध्ये एमपीएससीची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला. पण दीड वर्षांपासून त्याची मुलाखत झाली नाही. त्यामुळे पात्रता असूनही त्याला नोकरीपासून वंचित राहावं लागलं. इतकंच नाही त्याने मार्च 2021 मध्ये एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली, पण अजून मुख्य परीक्षेचा पत्ता नाही. त्यामुळे दडपणाखाली आलेल्या स्वप्निलसमोर आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्या सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्या व्यथा मांडत हे पत्र इतरांपर्यंत पोहोचवा, अनेकांचे जीव वाचतील अशी विनंती त्याने केली आहे.

स्पर्धा परीक्षा मायाजाल आहे, यात पडू नका

स्वप्निलने आत्महत्येपूर्वी स्पर्धा परीक्षा मायाजाल आहे, यात पडू नका, अशी काळीज पिळवटून टाकणारी एक सुसाईड नोट लिहिली आहे. येणा-या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वतःबद्दलची शंका वाढत जाते, असा शब्दांत त्याने आपली मनोवस्था मांडली आहे.

WhatsApp Image 2021 07 04 at 12.12.22 PM 1

मी खचलो नाही, कमी पडलो…

एमपीएससी उत्तीर्ण होऊन दोन वर्षे झाली आणि 24 वय संपत आलं आहे. घरची परिस्थिती, परीक्षा उत्तीर्ण होणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खाजगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतरांच्या वाढत्या अपेक्षा आणि मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही माझ्या मनातली भावना. कोरोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या, तर आज आपलं आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाही, फक्त मी कमी पडलो, माझ्याकडे वेळ नव्हता, अशा शब्दांत स्वप्निलने आपल्या मनातील वेदना मांडल्या आहेत.

अनेक जीव वाचतील

नकारात्मकतेची ही वादळे कित्येक दिवस मनात होती, पण काहीतरी चांगलं घडेल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे मी माझं आयुष्य जगू शकेन असं काहीच उरलं नाही, यासाठी कोणतीही व्यक्ती जबाबदार नसून हा माझा निर्णय आहे. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचवा अनेक जीव वाचतील, हे स्वप्निलचे शेवटचे शब्द आहेत.

आईचे तळतळाट

आपल्या मुलाच्या आत्महत्येनंतर स्वप्निलच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती, तर मंत्र्याला जाग आली नसती का? त्याचप्रमाणे दुस-यांच्या आई-वडिलांचाही विचार करा, असा आक्रोश स्वप्निलच्या आईने व्यक्त केला आहे. माझा तळतळाट आहे एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, त्याशिवाय सरकारला कळणार नाही मुलगा जाण्याचं दुःख काय असतं ते, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

यांना फक्त राजकारण महत्त्वाचं

दोन वर्षांपासून माझं पोरगं झुरत होतं. सरकारला काय खळणार आहेत वेदना? माझा मुलगा हुशार होता म्हणून तो इथपर्यंत पोहोचला, पण त्याची स्वप्न पूर्ण होण्याआधीच सरकारने असं मुलांना आत्महत्येसाठी प्रवुत्त करावं का? यांना नुसतं राजकारण आणि यांची भांडणं महत्त्वाची आहेत. इतरांची यांना काही काळजी नाही. कारण यांची मुलं सुरक्षित आहेत, गरीबाची कितीही मुलं मेली तरी यांना त्याच्याशी काही घेणंदेणं नाही, अशा वेदना या माऊलीने मांडल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.