MSRTC: राज्य सरकारने वेतनासाठी एसटी महामंडळाला १०० कोटींचा निधी मंजूर

गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील लालपरी अशी ओळख असलेल्या एसटीला मोठा ब्रेक लागला होता. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी अणि एसटी महामंडळाला नवसंजीवनी मिळण्यासाठी राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळासाठी १०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारच्या या मोठ्या घोषणेमुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.

(हेही वाचा – गोविंदा पथकांचा ‘विमा’ महापालिकांनी उतरवावा; ‘मनसे’ची मागणी)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांचे नवं सरकार स्थापन झाल्यानंतर अगदी पहिल्या कॅबिनेटपासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका लावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एक महिन्यांहून अधिक काळ संपाची हाक दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. संपकाळात जिल्ह्यांसह अनेक गावांचा संपर्क तुटला होता. त्यावेळी यातून मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एसटी महामंडळाच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. या मागण्यांमध्ये पगारवाढीची मागणी काही प्रमाणात मान्य करण्यात आली होती. या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.

एसटी कामगारांसाठी अच्छे दिन

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या जून महिन्यातील वेतनासाठी शासनाने १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याने चित्रा वाघ यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये नव्या सरकारचे अभिनंदन करताना, माजी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मविआच्या काळात झालेली १०० कोटींची चर्चा आणि शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये होत असलेली १०० कोटींची चर्चा, किती फरक आहे पाहा.. एसटी कामगारांसाठी अच्छे दिन आले आहेत. शिवसेना भाजपा सरकारचे धन्यवाद, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here