२४ तासांचा अल्टीमेटम! २ हजारांहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस

71

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील समस्त एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून ते त्यावर ठाम आहेत. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा हा बेमुदत संप मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळाने मोठं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या २ हजार २९६ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे.

२४ तासात कामावर हजर व्हा, अन्यथा…

सेवा समाप्तीची नोटीस बजावलेल्या २ हजार २९६ कर्मचाऱ्यांनी २४ तासांच्या आत कामावर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. अशा प्रकारची नोटीस एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या २ हजार २९६ कर्मचाऱ्यांना देऊन २४ तासांचा अल्टीमेटम दिला आहे.

(हेही वाचा- अनिल देशमुखांना घरचं जेवण नाकारणाऱ्या ‘त्या’ न्यायाधीशाची बदली)

भर पावसात कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याची विनंती केली होती. असे असतानाही, एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहे. त्यामुळे आता महामंडळाने कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाने संपाविरोधात हे मोठं पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाने आतापर्यंत २ हजार १७८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. तर दुसरीकडे, भर पावसात मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत हजर राहण्याचे वारंवार आवाहन केलं मात्र, संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.