एसटीला ‘साथ’ निवृत्त कर्मचाऱ्यांची!

64

मागील अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढी संदर्भात घोषणा करूनही अद्यापही कर्मचारी वर्ग कामावर रुजू झालेला नाही. या संपकाळात एसटी आगार सुरू झाले असले तरीही एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. लालपरीची नाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याशी जुळली आहे. एसटी बंद झाल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यावर तोडगा काढत महामंडळाने सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावण्याची तयारी सुरू केली आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले

मुंबई सेंट्रल आगारात केवळ सातारा व कोल्हापूर याच एसटी फेऱ्या सुरु आहेत. तर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मर्यादित चालक-वाहक हजर असल्याने एसटी सेवा पूर्ववत होऊ शकली नाही. एसटीच्या साध्या गाड्या तसेच विशेष सेवाही सुरू व्हाव्यात याकरिता महामंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेत कोरोना काळात निवृत्त झालेल्या चालक-वाहक पदावरील कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावले आहे. यासाठी आवश्यक प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

( हेही वाचा : आता तुमची इमारती होणार सील, महापालिकेचे नवे धोरण )

एसटी ठप्प! सामान्यांचे हाल

एसटीच्या एकूण २५० आगारांपैकी जवळपास ८० आगार बंद असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. आजवर ११ हजार ०२४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर, २ हजार ६११ कर्मचाऱ्यांना बडतर्फीसाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत बडतर्फ कामगारांची संख्या ९२५ एवढी आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते रुजू न झाल्याने एसटी महामंडळाने ही कारवाई केली.

एसटी बंद असल्यामुळे खासगी वाहनचालकांना फायदा होत असून प्रवाशांना मात्र मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. खासगी वाहनचालक अवाढव्य दर आकारत असल्याने एसटी लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत निवृत्त कर्मचाऱ्यांना परत कामावर बोलावले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.