‘CNG’ वरील गाड्या खरेदीचा निर्णय ‘MSRTC’ कडून रद्द; डिझेल गाड्याच घेणार!

112

इंधनावर होणारा वारेमाप खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने ‘सीएनजी’वरील गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अचानक डिझेलवरील गाड्यांसाठी निविदा काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

(हेही वाचा – PMGKAY: मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय)

ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीने आपल्या ताफ्यात लालपरी ऐवजी सीएनजी गाड्या दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतु, तो बाजूला सारत डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांच्या खरेदीसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. राज्यात सीएनजी पंप सर्वत्र उपलब्ध नसल्याने आणि अशा गाड्यांची वहन क्षमता कमी असल्याने आता सीएनजीऐवजी डिझेलच्या गाड्यांची खरेदी करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जारी केलेल्या ई- निविदेनुसार चासीस उत्पादकांकडून २००० चासीस (मुख्य बसच्या अंतर्गत इंजिन व अन्य यंत्रांसाठी बसवण्यात येणारी धातूची चौकट, खालचा गाडा) खरेदी करण्याची निविदा मागवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये एसटी धावते, अशा वेळेस सीएनजी बसची क्षमता कमी पडते. ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती व इतर बाबींचा विचार करता, १८० अश्वशक्ती क्षमता असलेल्या बसची आवश्यकता आहे. मात्र सीएनजीची क्षमता १३० अश्वशक्ती आहे. त्यामुळे सीएनजी गाड्यांचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे कळते.

दिवसाला लागते १० हजार कोटींचे डिझेल

– सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १६ हजार बस असून, दैनंदिन डिझेलसाठी १२ लाख लिटर म्हणजेच १० हजार कोटी रुपये खर्च होतात. रोजचे उत्पन्न १३.५० कोटी रुपये आहे.
– वर्षाला सरासरी ३ हजार कोटी केवळ डिझेलवर खर्च होत असल्याने सीएनजी बसची निवड करण्यात आली होती. मात्र वहन क्षमता आणि सीएनजी पंपाची उपलब्धता नसल्याने, तसेच पंप उपलब्ध करण्याबाबत कंत्राटदारांनी असमर्थता दर्शवल्याने अखेरीस सीएनजी गाड्यांच्या खरेदीचा निर्णय रद्द करावा लागला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.