एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यांतील गोर-गरीब कष्टकरी जनता व विद्यार्थी यांची प्रचंड आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे संपकर्त्यानी तूर्त संप स्थगित करुन एसटी सुरु कराव्यात व सरकारनेही सर्व मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा, या मागणीसाठी १० मार्च रोजी विधीमंडळासमोर एसटी वाचवा- एसटी वाढवा कृती समितीतर्फे धरणे धरण्यात येणार आहे.
संपामुळे मुलींच्या शिक्षणावर गदा
एसटीच्या संपामुळे मुख्यतः राज्यांतील मुलींच्या शिक्षणावर गदा आली आहे. ग्रामीण भागांतील मुलींचे शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर असून त्यामुळे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी १० मार्च रोजी, धरणे आंदोलन केले जात आहे. एसटी कामगारांना त्यांचे प्रश्न मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र एसटी ही राज्यांतील जनतेची जीवन वाहिनी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ( विशेषतः मुलींनी….) शिक्षण वाहिनी आहे, याचा विसर कामगार व सरकार दोघांनाही पडता कामा नये, असेही पत्रकात नमूद केले आहे.
(हेही वाचा – एसटी कर्माचा-यांचा संप थांबलाच पाहिजे, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल!)
संपकऱ्यांनी राजकारण्यांचे दुष्ट हेतुला बळी पडू नये
एसटी संपकऱ्यांनी काही मूठभर राजकारण्यांचे दुष्ट हेतुला बळी पडू नये. त्याचबरोबर एसटी कामगारांचे प्रश्न लोकांच्या पाठिंब्याशिवाय सुटू शकणार नाहीत आणि आजतरी या संपास लोकांची सहानुभूती राहिलेली नाही हे संबंधितांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. १३ महीने ताकदीने चालविलेले शेतकरी आंदोलनही कांही मागण्या मान्य झाल्यावर स्थगित करण्यात आले व प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चे बांधणी सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारनेही सहानुभूती दाखवत संपकर्त्यावर कारवाई न करता, त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा. या आधी जाहीर केलेले पगारवाढीसह अन्य लाभ लागू करावेत, एसटीच्या खाजगीकरणाचा दुरान्वयेही विचार करू नये, संपामुळे कारवाई झालेल्या सर्वांना सन्मानाने कामावर रुजू करुन घ्यावे, आंदोलनात जे प्राणास मुकले, त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई व एसटीमध्ये एकाला नोकरी द्यावी, आदी मागण्यांसाठी १० मार्च रोजी विधीमंडळासमोरील जनता दल पक्षाच्या कार्यालयात धरणे धरण्यात येणार आहे.
संप स्थगित करण्याचे आवाहन
या पार्श्वभूमीवर सरकारने देऊ केलेले लाभ पदरात घेऊन सामान्य जनता व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी संप स्थगित करण्याचे आवाहन एसटी वाचवा – एसटी वाढवा कृति समिति, महाराष्ट्रचे निमंत्रक नितीन पवार, धनाजी गुरव, सुभाष लोमटे, प्रभाकर नारकर, यांनी केले आहे. एसटी संपाबाबत दोन्ही बाजूंनी सामजस्याची भूमिका घेऊन तोडगा न काढण्यात आल्यास एसटी वाचविण्यासाठी जनतेच्या पुढाकाराने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले जाईल, असा इशाराही या सर्वांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community