बेस्ट कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिवाळी बोनस द्यावा अशी मागणी महाराष्ट्र वर्कर्स कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांच्यात वाढ करून तो ३४ टक्क्यांपर्यंत करावा आणि दिवाळीपूर्वी थकबाकी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामार्फत करण्यात आली आहे. दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा झालेली आहे. परंतु राज्याची मुख्य सार्वजनिक वाहतूक असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी अद्याप दिवाळी बोनस जाहीर झालेला नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ बोनस जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे, असे या संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.
( हेही वाचा : मुंबई-बंगळुरू प्रवास फक्त ५ तासांत; हरित द्रुतगती मार्ग विकसित करण्याची योजना)
एसटी वर्कर्सच्या मागण्या
- एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी, वेतन, भत्ते, सेवा सवलती लागू कराव्यात.
- शासनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करून दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम देण्यात यावी.
- घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात यावी.
- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा ३६० कोटी रुपये देऊन वेतन देय तारखेस द्यावे.
दरम्यान यासंदर्भात एसटीच्या आर्थिक बाबींबाबत महामंडळासोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
Join Our WhatsApp Community