सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना थकित रक्कम त्वरित द्यावी, राज्य मानवाधिकार आयोगाचे आदेश

213

एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे देय असलेले रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. मात्र जुलै २०१९ पासून राज्यभरातील तब्बल ८५०० निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्याना ही रक्कम अद्याप महामंडळाकडून मिळालेली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २१५ कोटी रुपये इतकी देणी थकीत आहेत. अशा आशयाची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीची स्वतःहून दखल घेत सदर थकित रक्कम त्वरित द्यावी असे आदेश राज्य मानवाधिकार आयोगाने एसटीच्या प्रशासनाला दिले आहेत व केलेल्या कारवाईची माहिती तक्रारदार श्रीरंग बरगे , सरचिटणीस महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस यांना द्यावी असी सूचना महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने एसटी महामंडळाला दिली आहे.

( हेही वाचा : ‘खोके आणि ओके’वरून भिडणारे आमदार एकत्र परदेश दौऱ्यावर)

महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याचे कारण अधिकारी सांगत असल्याने अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात गेल्या चार वर्षापासून चकरा मारत आहेत. ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही त्यामुळे दररोज ३० ते ५० लाख इतकी रक्कम निवृत कर्मचाऱ्यांना दिली जाते.हे प्रमाण अत्यल्प असून त्यामुळे निवृत कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे. महामंडळ आर्थिक अडचणीत आहे, हे खरे असले तरी जे कर्मचारी सध्या कामावर आहेत त्यांच्या वेतनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात चार वर्षासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर निवृत कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमेसाठी सुद्धा एक वेळचा पर्याय म्हणून २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप व सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकार व एसटी महामंडळाला केली होती.

११० पेक्षा अधिक निवृत्त कामगारांचा मृत्यू

संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या ८ हजार ५०० निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना चकरा माराव्या लागत आहे. मात्र, अद्याप महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत. गेल्या चार वर्षात थकीत देणी मिळण्याअगोदर ११० पेक्षा अधिक निवृत्त कामगारांचा मृत्यू झाल्याचीही माहिती बरगे यांनी दिली.

एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून लगेच दिले जातात. तसे परिपत्रक सुद्धा आहे. मात्र जुलै २०१९ पासून राज्यभरातील तब्बल आठ हजार पाचशे निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाहीत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे २१५ कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात गेल्या चार वर्षापासून चकरा मारत आहेत. शासन स्थरावर पत्र व्यवहार करण्यात आला आहे. पण त्याला यश आलेले नाही. काही कर्मचारी विविध व्याधींनी आजारी झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यांना औषध उपचारासाठी सुद्धा रक्कम कामी आलेली नाही. असेही बरगे यांनी सरकार व महामंडळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. त्याला अखेर यश प्राप्त झाले आहे. अनेक निवृत कर्मचारी व अधिकारी यांनी राज्य मानवाधिकार आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.