प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन अहोरात्र धावणाऱ्या एसटीला गेले काही महिने ब्रेक लागला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनता गेले पाच महिने आपल्या लाडक्या लालपरीच्या प्रतिक्षेत होती. आपल्या हक्कासाठी दीर्घकाळ चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याचा तिढा अखेर न्यायालयाच्या निकालानंतर सुटला आणि एसटी कर्मचारी प्रवाशांना सेवा देण्यासाठी पुन्हा एकदा कामावर रूजू झाले.
(हेही वाचाः एसटीचे ८२ हजार कर्मचारी कामावर हजर, ‘ते’ १० हजार महिनाभरात रुजू होणार)
यामुळे एसटीचे बिघडलेले वेळापत्रक आता पुन्हा सुरळीत होत आहे. पण राज्याच्याच नाही तर देशाच्या इतिहासात नोंद होईल असा लढा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला. वास्तविक एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढा काही नवीन नाही. स्वतःवर कितीही संकटं आली तरी कार्यतत्पर एसटी कर्मचारी परिस्थितीशी झुंजल्याची अनेक उदाहरणं देता येतील. इतकंच नाही तर जेव्हा आपल्या देशावर युद्धाचं संकट आलं होतं, तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी सुद्धा एसटीने सेवा दिली होती.
(हेही वाचाः एसटीच्या 48 हजार कर्मचाऱ्यांकडून घेतले पैसे; न्यायालयात सदावर्तेंची कबुली)
एसटीने पुरवली संरक्षण खात्याला सेवा
1962 च्या भारत- चीन आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या संरक्षण यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. त्यावेळी युद्धात शत्रूला पराभूत करण्यासाठी भारताला जास्तीत जास्त संसाधनांची गरज होती. युद्ध सामुग्री आणि भारतीय सैनिकांची ने-आण करण्यासाठी त्यावेळी भारतीय सेनेला गाड्यांच्या ताफ्याची आवश्यकता होती. अशावेळी प्रवाशांच्या सेवेसाठी धावणारी लालपरी देशाच्या सेवेसाठी धावून आली.
(हेही वाचाः अन् मुख्यमंत्री म्हणाले, ‘घरी जा…’)
या दोन्ही युद्धांच्या काळात एसटीच्या पुणे येथील दापोडी कार्यशाळेने एकूण 80 बसगाड्या आपत्कालीन परिस्थितीत बांधून भारताच्या संरक्षण खात्याला पुरवल्या होत्या. हिरव्या- पिवळ्या रंगाची ही बस ‘भारतीय सैन्याची बस’ याच नावाने ओळखली जाऊ लागली. या बसचा भारतीय सैन्य दलाच्या जवानांना युद्धादरम्यान कराव्या लागणाऱ्या वाहतुकीसाठी मोठा फायदा झाला होता.
(हेही वाचाः लोडशेडिंगवर तोडगा काढणार, ‘या’ राज्यातली खाणच घेणार! उपमुख्यमंत्र्यांची घोषणा)
कोविड काळात मुंबईत बेस्ट बसेस बंद असताना एसटीने मुंबईकरांना सेवा दिली. या काळात कोरोनामुळे अनेक एसटी कर्मचा-यांना आपले प्राण गमवावे लागले. वेळेवर पगार मिळत नसल्याने घर चालवण्यासाठी वणवण करणा-या एसटी कर्मचा-यांनी आपल्या प्रवाशांना प्रामाणिकपणे सेवा दिली. पण शेवटी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अखेर त्यांना संपाचे कठोर पाऊल उचलावे लागले.
Join Our WhatsApp Community