एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. पाच महिन्यानंतरही अद्याप कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, कामावर परतले नाहीत. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेने धावत नसून, राज्यात कंत्राटी चालकांची भरती सुरू करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून रत्नागिरीत आतापर्यंत ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सोलापूर आगारात सुद्धा कंत्राटी भरती करण्यात आली होती. तसेच, परिवहन मंत्री अनिल परब यांनी दखल घेत ११ हजार कंत्राटी चालकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता लवकरच लालपरी धावण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : एसटीअभावी प्रवाशांचे आतोनात हाल, अद्यापही संप सुरुच )
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागच्या पाच महिन्यापासून संप पुकारला आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्यदेखील केल्या आहेत. पण विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचारी ठाम असल्याने अद्याप कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही वारंवार संप मागे घेण्याबाबत कर्मचाऱ्यांना आवाहन केले. १ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची सूचना त्यांना देण्यात आली. अन्यथा बडतर्फीची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. त्यानुसार अनेक कर्मचारी कामावर रुजू झाले. पण बहुसंख्य कर्मचारी अजूनही संपावर आहेत.
५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
संप कधी मागे घेतला जाईल, याची शाश्वती नसल्याने राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केली आहे. रत्नागिरीत आतापर्यंत ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे. त्यांना कामावर घेताना एक वर्षाचा करारदेखील केला आहे. ज्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले आहे, त्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर हे कर्मचारी एसटीच्या सेवेसाठी कार्यरत होतील.
Join Our WhatsApp Community