एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. पाच महिन्यानंतरही अद्याप कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, कामावर परतले नाहीत. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेने धावत नसून, राज्यात कंत्राटी चालकांची भरती सुरू करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून सोलापूर विभागातही ६७ कंत्राटी चालकांची नियुक्ती केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे.
( हेही वाचा : ताठर भूमिका घेणा-या एसटी कामगारांवर कारवाई अटळ; नवीन भरती करणार )
एसटी महामंडळात आता कंत्राटी भरती सुरू
सरकारने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिल्यानंतर संपातील कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू होण्याचे आवाहन करून देखील कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळेच एसटी महामंडळात आता कंत्राटी भरती सुरू करण्यात आली आहे.
नियुक्तीचा कालावधी वाढवणार
संप सुरू असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे संपावर तोडगा काढण्यासाठी आणि एसटी सेवा पूर्ववत करण्यासाठी महामंडळाने कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर विभागात एकूण ८० चालकांची भरती केली जाणार असून, यातील सध्या ६७ चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातून २६० बस धावत असून दररोज ४० लाखांचे उत्पन्न मिळत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एक महिन्यासाठी नियुक्ती देण्यात येणार असून, त्यानंतर महामंडळाच्या सूचनेनुसार नियुक्तीचा कालावधी वाढविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community