संपकरी एसटी कामगार विलीनीकरणासाठी आग्रहीच! आता घेतली ‘ही’ भूमिका?

177

मागच्या तीन महिन्यांपासून सुरु असलेले एसटी कर्मचा-यांचे आंदोलन अद्याप थांबलेले नाही. राज्य सरकारनेही या आंदोलन करणा-या एसटी कर्मचा-यांना कोणतीही सहानुभूती दाखवलेली नाही. अशातच संपकरी एसटी कर्मचारी विलीनीकरणाबाबत ठाम असून, आपण यासाठी वकील सदावर्ते यांना पाठिंबा देणार असल्याचे, या संपकरी कर्मचा-यांनी स्पष्ट केले आहे. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होईलच असा विश्वास संपकरी कर्माचा-यांनी व्यक्त केला आहे.

सदावर्तेंना पाठिंबा

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचा-यांच्या मागण्या लक्षात घेता, विलीनीकरणाबाबत उच्चस्तरीय समितीची स्थापना करुन अहवाल 12 आठवड्यात सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही मुदत आता संपली आहे. त्यामुळे संपकरी आता अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. अहवाल काहीही असला, तरीही सपंकरी मात्र एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होईलच, असा विश्वास व्यक्त करत आहेत. संपक-यांच्या मागण्यांबाबत अॅड. सदावर्ते सुरुवातीपासून कायदेशीर मार्गाने लढा देत आहेत. समितीचा अहवाल काहीही आला, तरी कायदेशीर मार्गाने अॅड. सदावर्ते एसटी कर्माचा-यांना विलीनीकरण मिळवून देणार आहेत. त्यामुळे शासनाच्या अहवालातील शिफारशींची पर्वा नसल्याची प्रतिक्रिया संपक-यांच्या शिष्टमंडळातील सदस्या सविता पवार यांनी व्यक्त केली.

( हेही वाचा: कायदा सुव्यवस्था राखण्याचे लक्षण की बिघडवण्याचे लक्षण? दरेकरांचा सवाल )

आझाद मैदानात आंदोलन

एसटी महामंडळात 2019 मध्ये दुष्काळग्रस्त भागासाठी काढण्यात आलेल्या, भरतीतील 2 हजार 600 प्रशिक्षित चालक-वाहक उमेदवारही आता रस्त्यावर उतरले आहेत. या कर्मचा-यांना तीन वर्षांपासून नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी भेट झाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा इशारा या उमेदवारांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.