संपाचा परिणाम! खासगी चालकांमुळे होत आहेत एसटीचे अपघात?

112

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शंभर दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नाही. संपकरी कर्मचारी वारंवार विनंती करूनही कामावर हजर होत नाही. म्हणून, एसटी महामंडळाने सेवा पूर्ववत करण्यासाठी खासगी चालकांची नियुक्ती केली. कर्मचारी संपावर असताना प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी खासगी चालकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या परंतु, या अप्रशिक्षित खासगी चालकांमुळे आता प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, देळगाव अकोला येथे एसटी अपघातात ४ ते ५ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एसटीला अपघात 

अकोल्यामध्ये देळगाव राजा चिखली रोडवरील समर्थ कॉलेज जवळ, राज्य परिवहन आगार क्रमांक १ या एसटी बसचा अपघात होऊन यात ४ ते ५ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातासंदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलांच व्हायरल झाला आहे. राज्य सरकारच्या हेकेखोर भूमिकेमुळे तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आडमुठे भूमिकेमुळे या नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत असल्याचा आरोप या व्हिडिओमार्फत केला गेला आहे.

( हेही वाचा : ‘लालपरी’चा संप सुरूच! २४ तासांत एसटीच्या विलिनीकरणावर फैसला )

प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर 

कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करता, अप्रशिक्षित चालकांना कामावर रुजू करून महामंडळाने प्रवाशांचा जीव संकटात टाकला असा आरोपही या व्हिडिओ माध्यमातून करण्यात आला आहे. खरेतर, प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून खासगी चालक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु अशाप्रकारे अपघात होऊ लागले तर, प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.